काबूल; पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील गुरुद्वारावर शनिवारी झालेल्या हल्ल्यात दोघे ठार झाले. तर सात जण जखमी झाले. शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास हा हल्ला झाला. मृतांमध्ये गुरुद्वारातील एका मुस्लिम सुरक्षा रक्षकाचा आणि एका शिख व्यक्तीचा समावेश आहे. स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये स्फोट करण्यात आला. यामुळे जीवितहानी झाली. जेव्हा हा हल्ला तेव्हा सुमारे २५-३० अफगाण शीख सकाळच्या प्रार्थनेसाठी गुरुद्वारात आले होते. या हल्ल्याची अद्याप कोणी जबाबदारी घेतलेली नाही.
तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेली कार आणली होती. त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यानंतर गुरुद्वारामधील तिघेजण बाहेर आले. त्यातील जखमी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तानुसार, काबूलमधील गुरुद्वारा कर्ते-परवान प्रवेशद्वाराच्या बाहेर शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास दोन स्फोट झाले. त्यानंतर गुरुद्वार परिसराच्या आतही दोन स्फोट झाले. स्फोटामुळे गुरुद्वाराजवळील काही दुकानांना आग लागली. ही आग गुरुद्वाराच्या मुख्य दरबार हॉलपर्यंत पसरली असल्याचे वृत्त आहे.
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या खोरासान प्रांताच्या मीडिया शाखेने २०२० च्या गुरुद्वारा हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देणारा व्हिडिओ याआधी जारी केला होता. त्यानंतर हा हल्ला झाला आहे. इस्लामिक स्टेट संघटनेत सुन्नी पश्तूनांचाही समावेश असला तरी ते सत्ताधारी तालिबानचे शत्रू आहेत. त्यांचा हजारा, ताजिक्स, उझबेक आणि शीख या अल्पसंख्याक समुदायातील शेकडो लोकांच्या हत्येमागे हात आहे.
मार्च २०२ मध्ये काबूलच्या शॉर्ट बाजार भागातील श्री गुरु हर राय साहिब गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ शिखांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जखमी झाले होते.
भारताने हरिद्वारावरील हल्ल्याच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काबूलमधील पवित्र गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यामुळे आम्ही चिंतित आहोत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे. गुरुद्वारा कर्ते-परवान (Gurudwara Karte Parwan) येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वांनी तीव्र शब्दांत निषेध केला पाहिजे. हल्ल्याच्या वृत्तानंतर आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्हाला समाजाच्या सुरक्षेविषयी चिंता वाटत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटले आहे.