काबूल ; वृत्तसंस्था : काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करण्यासाठी इसिसचे आत्मघाती हल्लेखोर लपले असल्याच्या माहितीवरून अमेरिकेच्या लष्कराने रविवारी संध्याकाळी काबूलवर एअर स्ट्राईक केला. त्यात आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असलेल्या तीन गाड्या उडवून देण्यात आल्या. या हल्ल्यात इसिसच्या अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले असून, स्वसंरक्षणार्थ ही कारवाई केल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन सैन्याने रविवारी इसिसविरोधात जोरदार मोहीम उघडत हा ड्रोन हल्ला करण्यात आला. त्यात विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत स्फोटकांनी भरलेली कार उद्ध्वस्त करण्यात आली. या कारमध्ये एक दहशतवादी होता, अशी प्राथमिक माहिती आहे.
या परिसरात इसिस (खुरासान-के)चे दहशतवादी लपले असून, ते विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकन लष्कराला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई केल्याचे एका अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितल्याचे रॉयटरने म्हटले आहे.
हा हल्ला अफगाणिस्तान बाहेरून पाठवण्यात आलेल्या मानवरहित विमानाने करण्यात आला. त्याने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री उद्ध्वस्त झाल्यामुळे हवेत धुराचे लोट उसळले, असे एका अधिकार्याच्या हवाल्याने रॉयटरने रात्री दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
विमानतळाजळील ख्वाजा बुर्गाजवळ हा स्फोट झाला. दरम्यान, या हल्ल्यानंतर विमानतळाच्या परिसरात प्रचंड आवाज झाला आणि धुरांचे लोटच्या लोट उसळले. या स्फोटाने दहापेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. विमानतळाच्या उत्तरेकडील भागात एका घरावर रॉकेट धडकले आणि प्रचंड स्फोट झाल्याचे दोघा प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
इसिसच्या दहशतवाद्यांनी काबूल विमानतळावरील गर्दी, त्यातही अमेरिकनना लक्ष्य करीत गुरुवारी रात्री लागोपाठ दोन आत्मघाती हल्ले घडवून आणले होते. त्यात 183 जणांचा मृत्यू झाला. त्यांमध्ये अमेरिकेच्या 13 मरीन सैनिकांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एकेका हल्लेखोराला वेचून मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला होता.
अमेरिकन लष्कराने गुरुवारी रात्रीच नंगरहार प्रांतात केलेल्या ड्रोन हल्ल्यात काबूल हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि इसिस (के)च्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
विमानतळावर आणखी हल्ले होण्याची शक्यता बायडेन यांनी रविवारी व्यक्त केली होती. तसेच गुरुवारी करण्यात आलेला एअर स्ट्राईक शेवटचा नसेल, असेही स्पष्ट केले होते. त्यानंतर काही तासांतच अमेरिकेने दहशतवाद्यांना लक्ष्य करीत एअर स्ट्राईक केला.
काबूल विमानतळावर इसिसकडून हल्ले होऊ शकतात, असा इशारा तालिबानने दिला होता. सध्या इसिसचे जवळपास दोनशे दहशतवादी काबूलमध्ये लपले असल्याची माहिती आहे. ते पुन्हा हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे विमानतळाबाहेर खाकी जाबर आणि पीर सुलताना परिसरात शोधमोहीमही राबवली. त्यावेळी स्फोटकांनी भरलेल्या गाडी सापडल्याचे वृत्त आहे.