पुणे : ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे लाल गुलाबाची पन्नास कोटींहून अधिक उलाढाल

Red Rose
Red Rose
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आजच्या (सोमवार) 'व्हॅलेंटाईन डे'मुळे युरोपसह जागतिक बाजारातून वाढलेली मागणी आणि लग्नसराईमुळे देशातंर्गत बाजारपेठेतूनही एकाच वेळी मागणी वाढल्यामुळे 'टॉप सिके्रट' जातीच्या लाल गुलाबाचे भाव वधारले. त्यातून मावळ तालुक्यातील तळेगांव दाभाडे येथील फ्लोरिकल्चर पार्कमधील शेतकर्‍यांकडून समाधान व्यक्त होत असून मागील पंधरवड्यात गुलाब विक्रीतून सुमारे 50 ते 60 कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे.

या बाबत माहिती देताना तळेगांव दाभाडे येथील शेतकरी आणि पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे यांनी सांगितले की, मागील दोन वर्षे कोरोना साथीमुळे उलाढाल घटून शेतकर्‍यांचे झालेले नुकसान सध्याच्या तेजीमुळे बर्‍यापैकी भरुन निघाले आहे. कोरोना साथ अद्यापही कायम असल्यामुळे शेतकर्‍यांनी गुलाबाची लागवड मर्यादित ठेवण्यास प्राधान्य दिले होते. सुदैवाने कोरोना साथीचा परिणाम चालूवर्षी कमी राहिला. नियमित मागणी असताना लाल गुलाबास 4 ते 6 रुपये दर मिळत असतो. तो जागतिक बाजारातून मागणी वाढल्यामुळे गुलाबाचे भाव वाढण्यास मदत झाली. निर्यातीचा खर्च जाऊन शेतकर्‍यांना एका गुलाबास 14 ते 15 रुपये दर मिळाला आहे.

जागतिक बाजारपेठ व देशांतर्गत मागणीत दुप्पट वाढ

देशांतर्गत बाजारातूनही फ्लोरिकल्चर पार्कमध्ये लाल गुलाबास नेहमीच्या तुलनेत मोठी मागणी राहिली. कारण 18 फेब्रुवारीपर्यंत लग्नतिथी असल्यामुळे राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाब व अन्य राज्यांतून लाल गुलाबाची खरेदी वाढली. साधारणतः एका लाल गुलाबाची विक्री 20 रुपयांप्रमाणे झाली. जागतिक बाजार आणि देशांतर्गत मागणी एकाच वेळी सुरु झाल्याने गुलाब फुलांचे दर वाढीस हातभार लागला. त्यातून जागतिक बाजारात दोन कोटी आणि देशांतर्गत बाजारातही दोन कोटी मिळून सुमारे चार कोटींइतकी लाल गुलाबाची विक्री झालेली आहे. एका गुलाबास सरासरी पंधरा रुपये दर मिळाल्याचे पाहता तळेगांव दाभाडे येथील फ्लोरिकल्चर पार्कमध्ये 50 ते 60 कोटींची उलाढाल झालेली आहे. त्यामुळे कोरोना काळातील नुकसान भरुन काढण्यास सर्वच शेतकर्‍यांना मदत झालेली आहे. चालूवर्षी 10 फेब्रुवारीस गुलाब निर्यात थांबलेली असून समाधानाचे वातावरण शेतकर्‍यांमध्ये आहे.

विमान वाहतूक भाडे महागच

तळेगांव दाभाडे येथून गुलाबाचे पॅकिंग केल्यानंतर रेफ्रिजरेटर व्हॅनमधून मुंबई विमानतळावर वाहने जातात. तेथून युरोपसाठी विमान वाहतुकीचे भाडे एका गुलाबासाठी 7 ते 8 रुपये लागले. युरोपच्या बाजारात विक्रीसाठी आठ ते दहा दिवस गुलाब सुस्थितीत राहतो. जागतिक बाजारातून विविध कंपन्यांकडून होणारी खरेदी कोरोनामुळे आता ई-मेल, व्हिडिओ कॉलिंग आदी तंत्रज्ञानाचा वापर करुन मागणी नोंदवितात. शिवाय वर्षानुवर्षे शेतकरी ते आयातदार देशातील व्यापारी यांचे नाते विश्वासाचे निर्माण झाले आहे. त्यामुळे एक महिन्यात गुलाब विक्रीची रक्कम शेतकर्‍यांना मिळते.

मावळमधील अन्य शेतकरीही वळले फुलशेतीकडे

पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे जिल्ह्यात अकराशे शेतकरी सभासद आहेत. एकट्या तळेगांव दाभाडे येथे सुमारे बाराशे एकर क्षेत्रावर गुलाबासह अन्य फुलांची शेती फुललेली आहे. या शिवाय अन्य शेतमाल उत्पादनाऐवजी फुल शेती करण्याकडे मावळ तालुक्यातील शेतकर्‍यांचा कल वाढलेला आहे. जागतिक बाजारात इथोपिया, केनिया देशांतूनही युरोपच्या बाजारपेठेत लाल गुलाबाची विक्री होत असते. एकूण फुल व्यापारात भारताचा वाटा अत्यंत कमी आहे. तो वाढविण्याची मोठी संधी देशाला असल्याचेही भेगडे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news