पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याच्या डोक्यावर पाण्याची बाटली फेकण्याचा प्रकार घडला. इटालियन ओपनच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याला वैद्यकीय मदत घ्यावी लागली. शुक्रवारी १० मे रोजी फ्रान्सच्या कोरेन्टिन माउटेट विरुद्धच्या दुसऱ्या फेरीतील विजयानंतर ही घटना घडली.
जोकोविचने प्रतिस्पर्धी खेळाडू विरुद्ध ६-३, ६-१ असा सहज विजय मिळवल्यानंतर ऑटोग्राफ देत असताना त्याच्या डोक्यावर बाटली येऊन धडकली. बाटलीचा मार लागल्याने जोकोविचने लगेच त्याचे डोके धरले आणि तो गुडघ्यावर खाली वाकला. यादरम्यान कर्मचारी त्याच्या मदतीला धावले आणि त्याला टेनिस कोर्टवरून बाहेर नेण्यात आले.
हा प्रकार त्याला दुखापत करण्याच्या उद्देशाने घडला नसल्याचे ब्रॉडकास्टर फुटेजमधून उघड झाले आहे. एका प्रेक्षकाच्या पिशवीतून पाण्याची बाटली निसटली आणि ती दुर्दैवाने कोर्टबाहेर जाणाऱ्या जोकोविचच्या डोक्यावर आदळली. जोकोविचने नंतर त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर सांगितले की तो ठीक आहे आणि त्याने डोक्यावर आईस पॅक लावला आहे.
"सामना संपल्यावर नोव्हाक जोकोविच सेंट्रल कोर्टवरून बाहेर पडत असताना प्रेक्षकांना ऑटोग्राफ देत होता. यादरम्यान त्याच्या डोक्यावर पाण्याच्या बाटलीचा मार लागला," असे स्पर्धा आयोजकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
"माझी तुम्ही काळजी करणे यासाठी धन्यवाद," असे जोकोविचने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे. "हा एक अपघात होता आणि मी हॉटेलमध्ये बर्फाच्या पॅकसह आराम करत आहे. रविवारी भेटू." असे त्याने पुढे म्हटले आहे.
हे ही वाचा :