देहुगाव (पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून प्रस्थान होते. त्यानंतर हा पालखी सोहळा पहिल्या मुक्कामासाठी संत तुकाराम महाराजांच्या आजोळी, म्हणजेच इनामदारसाहेब वाड्यात विसावा घेतो. इनामदारसाहेब वाडा हा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामाचे पहिले स्थळ आहे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या इनामदारसाहेब वाड्याच्या विकासाकडे संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थान आणि शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
करोड़ो रुपयांचा निधी उपलब्ध करून शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत देहूगावचा विकास केला आहेर; परंतु इनामदारसाहेब वाडा आणि संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान मंदिर विकासापासून वंचित राहिले आहे, ही मोठी शोकांतिका असल्याची भावना काही वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. इनामदार वाड्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेे.
इनामदारसाहेब वाड्याचे प्रवेशद्वार तीन-चार फूट रुंदीचे आणि पाच ते सहा फूट उंचीचे आहे. पालखी जेव्हा या ठिकाणी मुक्कामासाठी येते, तेव्हा पालखीचे खांदेकरी सेवकांना पालखी आत नेताना आणि बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच सोबत काही दिंड्याचे वारकरी असतात. त्यामुळे या दरवाजातून संत तुकोबारायांची पालखी आत नेताना किंवा बाहेर येत असताना चेंगराचेंगरीचे प्रकार घड़तात. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने, भविकांची पाकिटे चोरतात. खिसे कापले जातात. पोलिस बंदोबस्त असला तरी प्रवेशद्वारच लहान असल्याने कोठे लक्ष ठेवणार, असा प्रश्न निर्माण होतो.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ज्या ज्या ठिकाणी विसावा घेतो अशा ठिकाणी पक्क्या स्वरुपातील विसावा स्थळ तयार केली आहेत. मात्र इनामदारसाहेब वाडा याला अपवाद ठरला आहे. इनामदारसाहेब वाडा हा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले विसावा स्थळ आहेे. या ठिकाणी आजही पक्के पालखी विसावा स्थळ केलेले नाही. एका लाकड़ीपाटावरच संत तुकोबांची पालखी ठेवली जात आहे. या पालखी मुक्काम स्थळावरील पत्र्याचे छप्पर जीर्ण होत आले आहे. ते पक्के करायला हवे. येथे पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. त्यांची गैरसोय होते.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत मंदिर व मंदिराच्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे; परंतु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिल्या मुक्कामाचे स्थळ म्हणजे इनामदारसाहेब वाडा. या पहिल्या पालखी मुक्काम स्थळाचा विकास रखड़ला आहे. इनामदारसाहेब वाड्याचा विकास लवकरात लवकर करावा, अशी मागणी आता वारकरी भाविक, तसेच स्थानिक ग्रामस्थ करू लागले आहेत.
हेही वाचा: