आता मिशन ॲडमिशन ! अकरावी, आयटीआय, तंत्रशिक्षण प्रवेशासाठी चुरस! | पुढारी

आता मिशन ॲडमिशन ! अकरावी, आयटीआय, तंत्रशिक्षण प्रवेशासाठी चुरस!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी-पालकांचे लक्ष अकरावी, डिप्लोमा, आयटीआय प्रवेशाकडे लागले असून, या तिन्ही अभ्यासक्रमांपैकी अकरावी तसेच तंत्रशिक्षण डिप्लोमासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर आयटीआयसाठी देखील एक ते दोन दिवसांत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

त्यानुसार विद्यार्थ्यांना वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. यंदा 66 हजार 578 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्याने नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस राहणार आहे. राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रांत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग 1 भरण्याची प्रक्रिया सुरू असून, पुण्यात साधारण 37 हजार 395 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 2 भरता येणार आहे. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावी प्रवेशासाठी गेल्या वर्षाप्रमाणेच जागा उपलब्ध राहणार आहे. काही ठिकाणी नव्या महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने जागा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अकरावी प्रवेशासाठी 1 लाख 11 हजार 665 जागा उपलब्ध होत्या. त्यात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे

पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू…

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना 21 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या प्रवेशासाठी साधारण 1 लाखावर जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने (डीटीई) प्रसिद्ध केले आहे. दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता तपशिलामध्ये स्वत:चा आसन क्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण भरावेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी https:// dte. maharashtra. gov. in या वेबसाइटवर भेट द्यावी.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया येत्या एक ते दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून 1 लाख 49 हजार 268 जागा उपलब्ध होत्या. आयटीआय प्रवेशाकडे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे अकरावीपेक्षा जास्त चुरस आयटीआय प्रवेशासाठी पाहायला मिळते. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https:// admission. dvet. gov. in या वेबसाइटला भेट द्यावी.

Back to top button