पुढारी ऑनलाईन डेस्क : "गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही" या राज्यपालांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर एका पाठोपाठ एक ट्विट करत मुख्यंमंत्र्यावर निशाणा साधला आहे. पण नितेश राणे (Nitesh Rane Tweet) यांची भूमिका मात्र राज्यपालांच्या समर्थनात आहे. त्यांनी ट्विटद्वारे राज्यपालांच्या वक्तव्याला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आज ते पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. काल (२९ जुलै) मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. ते कार्यक्रमात म्हणाले होते, "गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही" त्यांच्या या वक्तव्यावर सर्वसामान्य जनतेपासुन ते विरोधकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर एकामागून एक ट्विट करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पण नितेश राणे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत राज्यापालांच्या वक्तव्याला विरोध करणाऱ्यांवर ट्विटद्वारे टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "मा. राज्यपालांकडून कोणाचाही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी. किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना बीमसीचे कॉन्ट्र्रॅक्ट दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहिजे असतात." तर दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "एवढेच कशाला, तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही ??"
दुसऱ्या ट्विटमध्ये नितेश राणे यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी निशाणा हा शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे हे लक्षात येते. नितेश राणे यांच्या या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. राणे यांच्या भुमिकेलाही सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचलंत का?