नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या काळात अतिशय सक्रिय असणारे राज्यपाल आता एकदम गप्प का आहेत, असा रोखठोक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला आहे. महाराष्ट्रात दोन जणांचे अपंग सरकार काम करीत आहे. आता राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल जनता करीत आहे. भाजपा संवैधानिक पदाचा कसा दुरूपयोग करीत आहे याचे हे उदाहरण आहे, असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.
भाजपा तानाशाही करीत संवैधानिक व्यवस्थेच्या विरोधात काम करीत आहे. गडचिरोलीतील संकट आस्मानी नसून सुलतानी आहे. यासाठी भाजपा जबाबदार आहे. मेडीगट्टा धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात नुकसान होते आहे. ७५ हजार रूपये हेक्टरी मदत केली पाहिजे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला. त्यावरून स्मृती ईराणी यांनी सोनिया गांधींशी खालच्या पातळीवर येऊन वाद घातला. यातून भाजपाची संस्कृती दिसून येते. त्यागमूर्ती सोनीया गांधींचा खालच्या पातळीवर अपमान केला. देशातील जनता माफ करणार नाही, असेही नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले.