मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय ना…स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर राज्यपालांचा राजीनामा मागा : संजय राऊत

 मुख्यमंत्री शिंदे
 मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले तर इथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहू शकणार नाही, असा दावा भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे, "थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय? असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी एकामागोएक ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले राज्यपाल…?

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आज ते पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. काल (२९ जुलै) मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. ते कार्यक्रमात म्हणाले होते की, "गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही" असं वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यातुन सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर एकामागो एक ट्विट करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा

संजय राऊत यांनी राज्यापाल यांचा व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले आहे. त्यांनी ट्विटमध्ये मध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे. राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. ऐका… ऐका…

महाराष्ट्राचा घोर अपमान!

काय ती झाडी, काय तो डोंगर, काय नदी आणि आता काय हा मराठी माणूस.. महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत. जय महाराष्ट्र! म्हणतं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे गटातील आमदारांना टोला मारला आहे.

ऊठ मराठ्या ऊठ

राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका करत संजय राऊत यांनी मराठ्यांना भावनिक आवाहन केले आहे. "आता तरी ऊठ मराठ्या ऊठ. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल." असे भावनिक आवाहन ट्विटमधून राऊत यांनी केले आहे.

भाजपाने अजून का निषेध केला नाही? 

राज्यपालाकडुन मराठी जनतेचा अपमान केला जात आहे.  मुंबई ही कष्टकऱ्यांची आहे, सर्वसामान्यांची आहे. मराठी माणूस भिकारी आहे का? हा मराठी कष्टकरी जनतेचा अपमान आहे. राज्यपालांकडुन मराराष्ट्राचा वारंवार अपमान केला गेला आहे. मराठी माणसाचा राज्यपालांना द्वेश का? असे प्रश्न त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केले. राज्यपालांच्या वक्तव्यावर भाजपाने अजुनही का निषेध केला नाही. असा जाबही त्यांनी यावेळी विचारला. राज्यपालांना नाना शंकरशेठ यांच चरित्र देणार आहे.  त्यांनी ते वाचावं. असा खोचक टोलाही त्यांनी राज्यपालांना मारला आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news