आंबा घाट : सहाचाकी वाहनांच्या वाहतुकीस परवानगी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट येथून मंगळवारपासून सहाचाकी वाहनांची वाहतूक सुरू करण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. तशा प्रकारचे पत्र राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत रत्नागिरी जिल्हाधिकारी व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना पत्र सादर करण्यात आले आहे.

जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल बारा ठिकाणी दरड कोसळून आंबा घाट पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाला होता. मात्र, या नंतर कोसळलेल्या दरडी बाजूला करण्यात आल्यानंतर लहान वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. रस्ता खचल्यामुळे सहाचाकी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यानंतर संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने शिवसेना खा. विनायक राऊत हे आंबा घाटाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांची भेट घेतली होती. यावेळी खासदार राऊत यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत लवकरच जिल्हाधिकार्‍यांची बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल तसेच आंबा घाटातून सहाचाकी वाहतूक सुरू करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते.

यानुसार 29 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आंबा घाटातून सहाचाकी वाहनांची वाहतूक सुरू करण्यासंदर्भात निर्देशही देण्यात आले होते. मात्र यानंतरही ही वाहतूक आजपर्यंत बंद होती. मात्र, मंगळवारपासून सहाचाकी वाहनांच्या वाहतुकीला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. या परवानगीचे पत्र रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आंबा घाटातून मंगळवारपासून सहाचाकी वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

वजन जास्तीत-जास्त वीस टन किंवा त्यापेक्षा कमी

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वाहतुकीस परवानगी देताना जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सहाचाकी वाहनाचे एकूण वजन जास्तीत-जास्त वीस टन किंवा त्यापेक्षा कमी असावे. सहा चाकांपेक्षा जास्त चाकांच्या कोणत्याही वाहनास घाटातून प्रवासास पूर्णपणे प्रतिबंध असेल. आंबा घाटात वेगमर्यादा 40 कि.मी. प्रतितास असणार आहे. तसेच वाहन चालकांनी वेग वजन व रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने आंबा घाटातून सहाचाकी वाहनांच्या वाहतुकीला मंगळवारपासून परवानगी दिली आहे. परंतु ही वाहतुक नेमकी केव्हा सुरू होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news