सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेल्या नवदांपत्याला घेऊन जाणारी रिक्षा (एम एच १२ किव यू ७७०६) सासवडजवळ विहिरीत पडल्याने नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू झाला. तर दोन जणांना वाचवण्यात पोलिसांना यश आले. पुण्यातील धायरी येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नव विवाहितांची रिक्षा ही सासवड नजीक बोरगावकेमळा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली. यामध्ये या नवविवाहितांचा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. संसाराला सुरुवात होण्याअगोदरच या नवविवाहीतांचा दुर्दैवी शेवट झाला.
संबंधित बातम्या :
सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर या नवविवहितांचा आणि रिक्षातील असलेल्या इतर व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबियांसोबत असलेला संपर्क तुटला होता. मंगळवारी सकाळी व्यायामाला जाणाऱ्या मुलांना विहिरीतून 'वाचवा वाचवा' असे कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दोन व्यक्ती त्यांना त्या विहिरीत दिसल्या आणि यानंतर ही माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली सासवड पोलिसांनी दोघांना सुखरूप बाहेर काढल मात्र हे नवविवाहित जोडपं आणि एका तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातात आदित्य मधुकर घोलप, शितल संदिप शेलार (रा धायरेश्वर मंदिराजवळ, धायरीगाव, पुणे) बचावले आहेत तर, रोहित विलास शेलार, वैष्णवी रोहित शेलार, श्रावणी संदिप शेलार (रा धायरेश्वर मंदिराजवळ, धायरीगाव, पुणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.