Pune News : खडकवासला ते फुरसुंगी कालव्याऐवजी बंद पाइपलाइन! | पुढारी

Pune News : खडकवासला ते फुरसुंगी कालव्याऐवजी बंद पाइपलाइन!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणातून कालव्यातील पाण्याची गळती आणि बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी खडकवासला ते फुरसुंगी यादरम्यान 27 किलोमीटर बंद पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याच्या पर्यायावर मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. यासाठी कालव्याचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार असून, याबाबतचा अहवाल महिनाभरात सादर केला जाणार आहे. खडकवासला धरणातून शेतीसाठी मुठा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात येते.

याच कालव्याद्वारे गेल्या काही वर्षांपर्यंत पुणे शहरालाही पाणीपुरवठा होत होता. कालवा अत्यंत जुना झाला असून, गळती आणि बेकायदा उपशामुळे कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी तीन टीएमसी पाणी वाया जाते. दुसरीकडे, पुण्याची लोकसंख्या वाढत असल्याने मागणीही वाढत आहे. शहराला पाणीपुरवठ्यासाठी नव्याने धरण बांधण्यासाठी जागेची मोठी अडचण आहे. या पार्श्वभूमीवर कालव्यातून होणारा पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मागील काही वर्षांपासून बंद पाइपलाइन तसेच फुरसुंगी येथे बोगदा बांधून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून हा अहवाल शासनदरबारी पडून आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबईमध्ये बैठक झाली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पासाठी 2200 कोटी खर्च येणार

अहवालानुसार सध्याचा कालवा बंद करून बंद पाइपलाइनद्वारे फुरसुंगीपर्यंत पाणी नेण्याची योजना आहे. या प्रकल्पामध्ये फुरसुंगी येथे बोगदाही खोदण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 2200 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च कसा उभारायचा? यावर या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. सध्याच्या मुठा उजवा कालव्याची जागा जलसंपदा विभागाची आहे. खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत सुमारे 27 किमी कालवा आहे. या जागेचा वापर रस्ता, उड्डाणपूल अथवा मेट्रो मार्गिका अशा कोणत्या पद्धतीने अधिकाधिक चांगला राहील, याचाही अभ्यास करण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला.

हेही वाचा

Mumbai News : चुकीच्या इंजेक्शनमुळे मुलाचा पाय जायबंदी

Jalna Accident : बदनापूर जवळ ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली; २५ प्रवासी जखमी

Ajit Pawar : कंत्राटी भरतीचा निर्णय मागील सरकारचा; अजित पवारांचा गौप्यस्फोट

Back to top button