राजद्रोह कायद्यात बदल करण्‍याचा निर्णय स्‍वागतार्ह : शरद पवार

राजद्रोह कायद्यात बदल करण्‍याचा निर्णय स्‍वागतार्ह : शरद पवार

कोल्‍हापूर : पुढारी वृत्तसेवा

केंद्र शासनाने राजद्रोहाच्‍या कायद्यात फेरबदल करण्‍याचा घेतलेला निर्णय योग्‍य आहे. मुलभूत प्रश्‍नांपासून लक्ष विचलीत करण्‍याकरिता भोंग्यासारखे प्रश्‍न निर्माण करून वातावरण बिघडविण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करा, असे न्‍यायालयाने निर्देश दिले आहे. याचा अर्थ दोन आठवड्यात निवडणुका घ्‍या, असा होत नसल्‍याचे आपले मत आहे. ज्‍या टप्‍यावर निवडणूक थांबली आहे तेथून पुढे प्रक्रिया सुरू करावयाची. त्‍यामुळे अजून तीन, चार महिने निवडणुका होऊ शकत नाहीत. असे सांगून पवार म्‍हणाले, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकांबाबत सर्वांची चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

सरकारच्‍या चुकीच्‍या धोरणा विरोधात बोलण्‍याचा घटनेने दिलेला अधिकार आहे. या अधिकारावर कोणाला गदा आणता येणार नाही. त्‍यामुळे सरकार विरोधात बोलणे राजद्रोह कसा हाईल? असा सवाल करून पवार पुढे म्‍हणाले, भिमा कोरेगावमध्‍ये वाद निर्माण झाला. तो मिटविण्‍याची जबाबदारी तत्‍कालीन भाजप सरकारचीच होती. परंतू त्‍यांनी तसे न करता १२४ अ कलमाचा वापर करत गुन्‍हे दाखल केले. यावर आपण या कायद्यात बदल करण्‍याची भूमिका मांडली होती. सुरुवातीला त्‍याला केंद्राने नकार दिला. पण आता राजद्रोह कायद्यात बदल करण्‍याचा निर्णय घेत असतील तर योग्‍यच आहे.

माझा नातू काल अयोध्‍येला जाऊन आला. राज ठाकरे अयोध्‍येला चाललेत त्‍यात काय विशेष? कोणीही कोठे जाऊ शकतो असे एका प्रश्‍नाला उत्तर देत पवार पुढे म्‍हणाले, महागाई, बेकारीचा प्रश्‍न प्रचंड गंभीर बनला आहे. याच्‍या विरोधात लोक यापुढील काळात चळवळ व्‍यापक करतील. त्‍यामुळे या मुलभूत प्रश्‍नांपासून लोकांचे लक्ष विचलीत करण्‍याकरिता भोंग्‍यासारखे प्रश्‍न निर्माण करून धार्मिक भावनांच्‍या आधारे चळवळी उभ्‍या केल्‍या जात आहेत. हे समाजाच्‍यादृष्‍टिने वाईटआहे.

भाजपला पर्याय उभा करण्‍यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. परंतू प्रत्‍येक राज्‍यातील परिस्‍थिती वेगळी आहे. तेथील प्रश्‍न निराळे आहेत त्‍यामुळे त्‍या पातळीवर चर्चा झाली पाहिजे. पश्‍चिम बंगालमध्‍ये काँग्रेस कम्‍युनिस्‍ट ममता बॅनर्जीच्‍या विरोधात लढले, केरळमध्‍ये कम्‍युनिस्‍ट, राष्‍ट्रवादी एकत्र आहेत. ही परिस्‍थिती समजून घेऊन प्रथम त्‍यातून मार्ग काढला पाहिजे असे पवार यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, शहर अध्‍यक्ष आर. के. पोवार, व्‍ही. बी. पाटील, व्‍यंकाप्‍पा भोसले उपस्‍थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news