पुढारी ऑनलाईन : 'भारताच्या शास्त्रीय कालखंड' अंतर्गत इतिहास अभ्यासक्रमाचा भाग म्हणून महाकाव्य रामायण आणि महाभारत शाळांमध्ये शिकवले जावे, अशी शिफारस उच्चस्तरीय एनसीईआरटी (NCERT) पॅनेलने केली आहे. तसेच राज्यघटनेची प्रस्तावना वर्गाच्या भिंतींवर स्थानिक भाषेत लिहावी असा प्रस्तावही समितीने दिला आहे.
संबंधित बातम्या
या शिफारशी सामाजिक शास्त्राच्या अंतिम पोझिशन पेपरचा भाग आहेत. पण त्यांना अद्याप NCERT ची मान्यता मिळालेली नाही. समाजशास्त्र अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने भारतीय ज्ञान प्रणाली, वेद आणि आयुर्वेद यांचा शालेय अभ्यासक्रमांत समावेश करण्याची सूचना केली होती.
समाजशास्त्रांवरील अंतिम 'पोझिशन पेपर'साठी समितीच्या शिफारशी नवीन NCERT पुस्तकांच्या विकासाचा पाया रचण्यासाठी एक प्रमुख निर्देशात्मक दस्तऐवज आहे.
"NCERT पॅनलने इतिहासाचे चार कालखंडात वर्गीकरण करण्यासाठी शिफारसी केल्या आहेत. त्यात शास्त्रीय कालखंड, मध्ययुगीन कालखंड, ब्रिटिश कालखंड आणि आधुनिक भारत याचा समावेश आहे. आत्तापर्यंत भारतीय इतिहासाचे फक्त प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन कालखंडात वर्गीकरण केले गेले आहे." असेही पॅनेलने म्हटले आहे.
निवृत्त इतिहासाचे प्राध्यापक सी. आय. आयजॅक (CI Issac) हे या पॅनेलचे प्रमुख आहेत. "भारताच्या शास्त्रीय कालखंड' अंतर्गत महाकाव्य रामायण आणि महाभारत शिकवले जावे," असे त्यांनी पुढे म्हटले आहे. प्रभू श्रीराम कोण होते आणि त्यांचा उद्देश काय होता हे विद्यार्थ्यांना कळले पाहिजे असे आमचे मत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पाठ्यपुस्तकांमध्ये एक किंवा दोन ऐवजी भारतात राज्य केलेल्या सर्व राजघराण्यांना स्थान द्यावे, असा प्रस्तावही पॅनेलने मांडला आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये 'इंडिया' ऐवजी भारत लिहिण्याची शिफारसही समितीने केली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत NCERT त्यांच्या अभ्यासक्रमात बदल करत आहे. यासाठी १९ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अभ्यासक्रमातून प्राचीन इतिहास काढून शास्त्रीय इतिहास आणि हिंदू योद्धांच्या विजय गाथांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे.