वॉशिंग्टन : सध्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आत्मचरित्र 'ए प्रॉमिस्ड लँड' जगभर चर्चेत आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे की त्यांची बालपणातील अनेक वर्षे इंडोनेशियात गेली. तिथे रामायण आणि महाभारत अत्यंत लोकप्रिय आहे. त्यामुळे लहानपणीच आपण या ग्रंथांमधील कथा ऐकल्या होत्या. त्यांचे मूळ स्थान असलेल्या भारताविषयी लहानपणापासूनच ओढ होती, या देशाविषयी माझ्या काही कल्पना, स्वप्ने होती. मात्र, 2010 मध्ये राष्ट्राध्यक्षपदी असतानाच तिथे जाण्याची संधी मिळाली, असे त्यांनी लिहिले आहे.
ओबामांनी या पुस्तकात लिहिले आहे, भारताविषयी माझ्या मनात खास स्थान आहे. मी लहानपणी अनेक वर्षे इंडोनेशियात घालवली. तिथेच भारतीय संस्कृतीमधील महान ग्रंथ रामायण आणि महाभारत यामधील अनेक कथा ऐकल्या होत्या. भारताविषयी आणखी आत्मियता वाटण्याचे कारण म्हणजे हा देश खूप मोठा आहे. जगातील एकूण लोकसंख्येचा सहावा हिस्सा याच देशात आहे. तिथे दोन हजारांपेक्षाही अधिक जनजाती असून सातशेपेक्षाही अधिक भाषा बोलल्या जातात. मात्र, भारताचा प्रवास करण्याची संधी मला बर्याच उशिरा मिळाली. ती संस्मरणीयही ठरली. कॉलेजच्या दिवसांमध्ये माझे अनेक भारतीय व पाकिस्तानी मित्र होते. ते मला दाल किंवा खिमा कसा बनवायचा हे सांगत. त्यांनी मला बॉलीवूडचे अनेक चित्रपटही दाखवले होते. ओबामा काही वस्तू सतत आपल्याजवळ बाळगतात. त्यांच्या खिशात नेहमी हनुमानाची छोटी मूर्ती असते हे विशेष!