नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मुघल कालखंडातील काही घटनांबाबतचा मजकूर हटवल्यानंतर NCERTने पुन्हा एकदा मोठे पाऊल उचलले आहे. एनसीआरटीने आता जगातील महान शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांती सिद्धांताचा मजकूर विज्ञानाच्या अभ्यासक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. आता डार्विनचा हा सिद्धांत ९ वी आणि १० वीच्या अभ्यासक्रमात नसणार आहे. त्यामुळे बोर्डाच्या निर्णयावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी देशभरातील १८०० हून अधिक शास्त्रज्ञ, शिक्षक आणि विज्ञानाशी संबंधित व्यक्तींनी सीबीएसईच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून एक खुले पत्रही जारी केले आहे.
ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीने या निर्णयासंदर्भात एक प्रेस नोट जारी केली आहे. ज्यामध्ये उत्क्रांती सिद्धांताविरुद्ध अपील असे शीर्षक आहे. त्यावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यासारख्या मोठ्या वैज्ञानिक संस्थांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली आहे. हा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन विज्ञानाशी संबंधित मंडळींनी केले आहे.
खरं तर, सीबीएसईने कोविड -19 साथीच्या आजारानंतर विद्यार्थ्यांवरील ओझे कमी करण्यासाठी अभ्यासक्रम अधिक तर्कसंगत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे याआधी मुघलांशी संबंधित अनेक संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील 'आनुवंशिकता आणि उत्क्रांती' हा अध्याय ९ वा 'आनुवंशिकता' असा बदलण्यात आला आहे. असे असताना हे केवळ एका शैक्षणिक सत्रासाठी करण्यात आल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत होते. मात्र आता तो अभ्यासक्रमातून कायमचा हटविण्यात आला आहे. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत अभ्यासक्रमातून काढून टाकणे म्हणजे 'शिक्षणाची थट्टा' आहे, असे वैज्ञानिक गटाचे मत आहे.
डार्विनच्या सिद्धांताबाबत, शास्त्रज्ञांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, उत्क्रांतीचा सिद्धांत मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत विद्यार्थ्यांना गंभीर विचार आणि वैज्ञानिक पद्धतीचे महत्त्व शिकवतो. म्हणूनच विद्यार्थ्यांना डार्विनच्या सिद्धांताचे ज्ञान देणे अत्यंत आवश्यक आहे. (NCERT)