नबाब मलिक यांच्यासारखे नेते माझ्या खिशात आहेत, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकताय याची वाट पाहतोय; मग मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे,' असे आव्हानच मलिक यांनी दिले आहे. मलिक यांनी पाटील यांचा व्हिडिओ ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.
एनसीबीने क्रूजवरील ड्रग्ज पार्टीवर टाकलेला छापा बोगस होता, असा आरोप करत नबाब मलिक यांनी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. या कारवाईत भाजपचे पदाधिकारी कसे सामील झाले? असा सवाल मलिक यांनी केला होता.
या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे मलिक यांनी केले होते. त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी मलिक यांच्यावर समीर यांची बाजू घेऊन आरोप केले होते.
याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना नबाब मलिक यांच्यासारखे नेते आपल्या खिशात आहेत, असे वक्तव्य केले होते. यावर मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मलिक म्हणाले, 'भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे. चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका."
याप्रकरणी धनंजय मुंडे म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटल यांचेच काय भाजपाच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. त्यांनी आपली मर्यादा ओळखून बोलायला शिकले पाहिजे.'
भाजपचे मोठेमोठे नेते, त्यांचे जवळचे कार्यकर्ते एनसीबीच्या ऑफिसमध्ये जातात आणि अधिकाऱ्यांना भेटतात. काही मोठ्या नेत्यांचे राइट हँड समीर वानखेडे यांना भेटत आहेत. मी हे जबाबदारीने सांगतोय. पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी अनेक गुपितं बाहेर येतील म्हणून भाजपाचे लोक घाबरायला लागला आहेत. के. पी. गोसावी, भाजपाचा एक नेता, त्याच पत्नी एका खासगी कंपनीत संचालक आहेत. विधानभवनाच्या पटलावर मी हे सर्व ठेवणार आहे.'