पुढील आठवड्यात नैसर्गिक वायूच्या दरात वाढ होण्याची शक्यता

पुढील आठवड्यात नैसर्गिक वायूच्या दरात वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक वायूचे दर भडकले असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात नैसर्गिक वायूच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. आंतरराष्ट्रीय दराचा आढावा घेऊन वर्षातून दोनदा १ एप्रिल आणि १ ऑक्टोबर रोजी वायूच्या दरात वाढ किंवा घट केली जाते. त्यानुसार पुढील एक तारखेला वायूच्या दरात वाढ होणे अटळ मानले जात आहे.

नैसर्गिक वायूचा वापर प्रामुख्याने खत उत्पादक कारखाने, वीज निर्मिती कंपन्या आणि वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो. गेल्या काही महिन्यात जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक वायूचे दर मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसीला त्यांच्याकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या वायूसाठी 6.1 डॉलर्स प्रती 'एमएमबीटीयू' च्या (प्रती दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटस) तुलनेत 9 डॉलर्स प्रती एमएमबीटीयू इतका दर दिला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खाजगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या वायूसाठी 9.92 प्रती 'एमएमबीटीयू' च्या तुलनेत 12 डॉलर्स प्रती एमएमबीटीयू इतका दर दिला जाण्याची शक्यता आहे.

येत्या 1 ऑक्टोबर रोजी नैसर्गिक वायूच्या दरात वाढ करण्यात आली तर एप्रिल 2019 नंतरची ही तिसरी वाढ ठरेल. अमेरिका, कॅनडा आणि रशिया हे नैसर्गिक वायूचे सर्वात मोठे उत्पादक देश आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरु झालेल्या युद्धानंतर नैसर्गिक वायूचे दर सर्वकालीन उच्चांकी स्तरावर गेलेले आहेत. विशेष म्हणजे रशियाने युरोपचा वायू पुरवठा खंडित केल्याने आगामी काळात वायूचे दर आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news