राहू : केवळ राजकारण करणार्‍यांना बाजूला करा: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आवाहन | पुढारी

राहू : केवळ राजकारण करणार्‍यांना बाजूला करा: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आवाहन

राहू; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी असून, लढवय्ये म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील लोकांनी संधीसाधूपणा करत केवळ राजकारण करणार्‍या लोकांना खड्यासारखे बाजूला करण्याचे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहू (ता. दौंड) येथे केले. लोकसभा प्रवास योजना बारामती लोकसभा मतदारसंघ महिला मोर्चा प्रतिनिधीशी संवाद, सोशल मीडियाप्रमुख तसेच ज्येष्ठ कार्यकत्र्यांशी संवाद मोहिमेअंतर्गत त्या बोलत होत्या.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नाव न घेता सीतारामन म्हणाल्या की, काही लोक कृषिमंत्री होते परंतु त्या लोकांना शेतकर्‍यांना न्याय देता आलेला नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात अपयश आले. आतापर्यंत केवळ संधीसाधू राजकारण केले. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही पद्धतीची घराणेशाही चालत नसून, भाजपाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दौंडचे आमदार राहुल कुल यांचे कौतुक करत केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल कुल यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीविठ्ठलाच्या कृपेने राज्यामध्ये सत्ताबद्दल झाला असून विद्यमान सरकार अनेक लोकहिताचे निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. राहू येथे पदयात्रा व सीतारामन यांच्या हस्ते वृक्षलागवडही करण्यात आली.

आमदार राहुल कुल आपल्या भाषणात म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे मदत केली असून, यापुढील काळामध्येही लोकसभेसाठी अविरत काम करणार आहे. याप्रसंगी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार रंजना कुल आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक वर्षा तापकीर यांनी, तर सूत्रसंचालन बापूसाहेब भागवत यांनी केले. आभार सरपंच दिलीप देशमुख यांनी मानले.

बारामतीत परिवर्तन घडेल : कांचन कुल
भारतीय जनता महिला मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष कांचन कुल म्हणाल्या की, महिलांचे योग्य व मजबूत संघटन बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चित परिवर्तन घडवेल.‘बारामती लढेंगे और जितेंगे’ असा इशाराही त्यांनी दिला.

Back to top button