त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : देवयानी ढोन्नर
येथील ब्रह्मगिरी पर्वताचे दगड सुटून दरडी कोसळण्याच्या घटनांच्या आठवणी इर्शाळावाडी घटनेने पुन्हा जाग्या झाल्या आहेत. सुपलीची मेट तसेच आदिवासींच्या इतर मेट (वस्ती) भूस्खलनाच्या छायेत आहेत. माळीण, इर्शाळवाडीच्या दुर्घटनांनी ब्रह्मगिरीची सुरक्षा पुन्हा चर्चेत आली आहे.
दरड कोसण्याचा सर्वाधिक धोका ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या मेटला आहे. यापूर्वी विनायक खिंड येथे एकाचा बळी गेला. जांबाची मेट येथे देखील भूस्खलन झाले. भाविकांना ब्रह्मगिरीवर जात असताना प्राण गमवावे लागले, तर कधी गंभीर जखमी होऊन जायबंदी झाले आहेत.
जुन्या आराखड्यावर भर
त्र्यंबकेश्वर येथे यावर्षी मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झालेली नाही आणि झाली असेल, तरी आपत्ती व्यवस्थापन आराखडा कोणालाच उपलब्ध नाही. काही वर्षांपूर्वी तयार केलेला आराखडा वापरला जात असून, ही धक्कादायक बाब आहे. दोन वर्षांपूर्वी एका जमीन विकसकाने ब्रह्मगिरीच्या पोटाला सुरूंग लावून उत्खनन केल्यापासून सुपलीची मेट भूस्खलनाच्या छायेत आले आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाला विसर पडला असावा, अशीच स्थिती आहे.
ब्रह्मगिरीच्या पोटाला सुपलीची मेट, गंगाद्वार मेट, जांबाची मेट, पठाराची वाडी, विनायक खिंड, महादरवाजा मेट या वस्त्या आहेत. येथील एकूण लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे. यातील विनायखिंड मेट ही वस्ती पावन गणपतीच्या जवळच्या टेकडीवर स्थलांतरित करण्यात आली आहे. सुपलीची मेट आणि गंगाद्वार मेट या दोन वस्त्यांचे स्थलांतर करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी लग्नस्तंभाजवळ गट नंबर 71 या जमिनीवर स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी 1.82 हेक्टर जमीन शासनाने ग्रामपंचायतीला वर्ग केली आहे, मात्र मोजणी करून अद्याप ताब्यात दिलेली नाही.
आपत्तीला मानवनिर्मित कामांमुळे निमंत्रण
गेल्या दोन वर्षांत ब्रह्मगिरी परिसरात मोठया प्रमाणात उत्खन्न झाले. भराव टाकणे, सपाटीकरण यामुळे अनेक नैसर्गिक प्रवाह बदलले आहेत. आपत्तीला निमंत्रण देणारी मानवनिर्मित कामे झाली आहेत. दुर्दैवाने आपत्ती आल्यास या मेटांवर जाण्यास धड रस्तेही नाहीत. सुपलीची मेट येथे जाण्यासाठी असलेला रस्ता नावाला आहे. लग्नस्तंभापासून गंगाद्वार मेटपर्यंत अद्यापही रस्ता नाही. तेथे वाहन पोहोचणे आजही अशक्य आहे. इतर मेटांची परिस्थिती तर यापेक्षाही भयावह आहे.
हेही वाचा :