Robot : ‘या’ रोबोला येतो चक्क घाम, वाजते थंडीही! | पुढारी

Robot : ‘या’ रोबोला येतो चक्क घाम, वाजते थंडीही!

न्यूयॉर्क : जगभरात हरेक नमुन्यांचे रोबो बनवण्यात आले आहेत. चेहर्‍यावर विविध हावभाव दर्शवणारे मानवाकृती रोबोही बनले आहेत, ज्यांच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर केलेला आहे. आता संशोधकांनी जगातील पहिला असा रोबो बनवला आहे ज्याला चक्क घामही येतो! इतकेच नव्हे तर थंड वातावरणात तो कुडकुडतो. हा रोबो माणसासारखेच श्वासही घेतो. मानवी शरीर उष्ण हवेचा सामना कसा करते हे जाणून घेण्यासाठी हा रोबो बनवण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले.

अमेरिकेतील अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी मानवी शरीराच्या ‘थर्मल फंक्शन’ला जाणून घेण्यासाठी अशा मेनिक्विनला (पुतळा) रिडिझाईन केले ज्याचा वापर स्पोर्टस् क्लोदिंग कंपन्या करतात. या रोबोला ‘अँडी’ असे नाव देण्यात आले आहे. त्याला घाम यावा, त्याचे तापमान समजावे यासाठी त्याच्यामध्ये 35 ठिकाणी सिंथेटिक पोर्स आणि हिट फ्लक्स सेन्सर बसवण्यात आले आहेत. या रोबोच्या माध्यमातून मानवावर होणार्‍या हवामान बदलाच्या परिणामाचाही अभ्यास केला जाऊ शकतो. संशोधिका जेनी वॅनोस यांनी सांगितले की सध्या लोक उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त झाले आहेत. त्याच्यावरील उपाय शोधण्यासाठी आपण मानवावर प्रयोग करू शकत नाही.

माणूस किती उष्ण तापमान सहन करू शकतो हे जाणण्यासाठी आपण त्याला उन्हात उभे करू शकत नाही की उष्ण खोलीत बसवू शकत नाही. यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही ‘अँडी’ची निर्मिती केली. त्याच्या टेस्टिंगसाठी तसेच अभ्यासासाठी त्याला हिट चेम्बरमध्ये ठेवण्यात आले. हिट चेम्बरला आम्ही ‘वॉर्म रूम’ म्हणतो. तेथील तापमान 60 अंश सेल्सिअस आहे. या रूममध्ये त्याचा सामना उष्ण हवा आणि सोलर रेडिएशनशी केला. त्याच्यामध्ये होणार्‍या बदलांशी निगडीत डेटा गोळा करण्यात आला. त्याच्यामध्ये लावलेले सेन्सर्स उष्णता आणि सौर किरणोत्सर्गाच्या संपर्कात येताच शरीरात होणार्‍या प्रतिक्रियांना रेकॉर्ड करतात.

रोबोच्या प्रत्येक पार्टमध्ये चॅनेल लावले आहेत जे या रोबोच्या वेगवेगळ्या भागांना काम करण्यासाठी कनेक्ट करतात. हे तेच चॅनेल्स किंवा पार्टस् आहेत ज्यांच्या माध्यमातून घाम येतो. अर्थात या रोबोच्या अंतर्गत भागात एक हिस्सा पाण्याचाही आहे. ज्यावेळी चॅनेल्स हिटअप किंवा गरम होतात त्यावेळी हे पाणी घामाच्या रूपाने बाहेर येते. या रोबोला ज्यावेळी एका स्पेशल फॅब्रिक म्हणजेच कपड्यात लपेटले त्यावेळी या कापडाने त्याचा घाम शोषून घेतला. त्यामुळे त्याच्या तापमानात बदल झाला व तो बर्‍याच अंशी थंड झाला. वेगवेगळ्या लोकांची उष्णता सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. ‘अँडी’ला अशाप्रकारे तयार करण्यात आले आहे की तो वजन, वयाच्या आधारे वेगवेगळ्या लोकांच्या अनुषंगाने उष्णतेच्या परिणामांवर प्रतिक्रिया देईल. याचा अर्थ हा रोबो एका मधुमेही आणि सामान्य माणसामधील थर्मल फंक्शनमधील फरक समजू शकतो.

Back to top button