तब्बल 27 देशांमध्ये अजूनही नाही रेल्वे!

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये दीडशे वर्षांपूर्वीच जमिनीवरूनच नव्हे तर जमिनीखालूनही रेल्वे धावत होत्या. आपल्या देशात मुंबई ते ठाणे मार्गावरील पहिल्या ‘झुकझुकगाडी’नंतर आता रोज सुमारे अकरा हजार रेल्वे धावतात आणि कोट्यवधी लोक त्यामधून प्रवास करतात. रेल्वे हा यांत्रिक वाहतुकीचा हा सर्वात जुना प्रकार असल्याचे मानले जाते. इसवी सनापूर्वी 600 या काळात ग्रीसमध्ये असे वाहन वापरले जात होते असे म्हटले जाते. वाफेचे इंजिन आल्यावर पहिल्या व्यावसायिक रेल्वेची निर्मिती झाली.
आज जगातील बहुतांश देशांमध्ये रेल्वेचे जाळे असले तरी अजूनही असे काही देश आहेत जिथे रेल्वे नेटवर्क नाही! त्यामध्ये आपल्या शेजारच्या भूतान या देशाचाही समावेश होतो. भूतानमध्ये आता भारताकडूनच एक रेल्वे लाईन बनवली जात आहे. 57 किलोमीटरच्या या लाईनची निर्मिती 2026 पर्यंत पूर्ण होऊ शकते. जगात ज्या देशांमध्ये अजूनही रेल्वे नेटवर्क नाही ते सहसा छोटे आणि बेटवजा देश आहेत. अंडोरा हा जगातील अकरावा सर्वात छोटा देश आहे. तसेच जगाच्या नकाशात आलेल्या सर्वात नवीन देशांपैकी ईस्ट तिमूरमध्येही रेल्वे नेटवर्क नाही.
आफ्रिकेतील गिनी-बिसाऊ तसेच कुवेत या आखाती देशातही रेल्वे नाही. माल्टा आणि सायप्रस या देशांमध्ये एके काळी रेल्वे नेटवर्क होते; पण आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना बंद करण्यात आले. आईसलँडसारख्या काही देशांमध्ये भौगोलिक परिस्थितींमुळे रेल्वे नेटवर्क बनू शकले नाही. लिबिया, कतार, रवांडा, सॅन मॅरिनो, सोलोमन आयलंडस्, सोमालिया, सूरीनाम, टोंगा, त्रिनिनाद अँड टोबॅगो, तुवालू, वनुआतू आणि येमेन या देशांमध्येही रेल्वे नाही.