नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
दुकानात फार्मासिस्ट नसताना औषध विक्री करणाऱ्या अशोकनगर येथील सावरकर बस स्टॉपसमोरील मेडप्लस मेडिकल दुकान बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहे. या कारवाईने फार्मासिस्ट नसताना औषध विक्री करणाऱ्या मेडिकलधारकांचे धाबे दणाणले आहेत.
डिस्काउंटचे आमिष दाखवत परवानगी नसलेले तसेच चुकीचे औषध विक्री करत रुग्णांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मेडप्लस मेडिकलवर कारवाई करत दुकान सील करावे, अशी मागणीवजा तक्रार संघर्ष क्रांती फाउंडेशनने अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषध) मुकुंद डोंगळीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मेडप्लस मेडिकल दुकानात छापा मारत पाहणी केली. पाहणीदरम्यान दुकानातील खरेदी-विक्रीच्या तपशिलात तफावत आढळली असून, फार्मासिस्टविना औषधविक्री केली जात असल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने डोंगळीकर यांनी दुकानदारास तत्काळ दुकान बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या कारवाईचा अहवाल तयार केला असून, वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कारवाई होणार आहे.
तक्रारीसाठी पुढे यावे
फक्त नाशिकमध्ये एकूण तीन हजार चारशे मेडिकल आहेत. सर्वांची पाहणी करणे शक्य नाही. सरकारी नियमानुसार महिन्याला पंधरा दुकाने तपासण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे तक्रारी आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे.
– मुकुंद डोंगळीकर, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषध)
हेही वाचा :