कर्जत : कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलणार; पंधरा दिवसांत सरकार घेणार निर्णय

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कृषी सहाय्यकांच्या पदनामात सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्याचा निर्णय येत्या पंधरा दिवसांत सरकारकडून घेण्यात येईल, असे आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. याबाबत आमदार प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्त्ति केला होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली निघणार आहे.
राज्यातील कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेकडून सातत्याने सरकारकडे होत होती. या मागणीची दखल घेत आमदार शिंदे यांनी गुरुवारी (दि.23) विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नांवर उत्तर देताना कृषीमंत्री सत्तार यांनी हे आश्वासन दिले.
सुधारित आकृतिबंधात कृषी सहाय्यक यांच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी असे करण्याची संघअनेची मागणी होती. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न निकाली निघणार असल्याने कृषी सहाय्यकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष संदीप केवटे यांनी आमदार शिंदे, कृषीमंत्री सत्तार व सरकारचे आभार मानले आहेत.
आकृतिबंधात पदे वाढीची मागणी
कृषी विभागाचा नवीन आकृतिबंध करताना कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक या संवर्गाची पदे कमी न करता, त्यात कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आकृतिबंधाच्या सभेत संघटनेने सुचविल्याप्रमाणे वाढ करण्याचीही मागणी होती.