नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत आज शुक्रवारी (दि १२) रोजी देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारा लगत असलेल्या खाजगी जागेवर शेतकरी, व्यापारी, आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठींब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून येथील कळवण रोडवर प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन कांदा खरेदी लिलाव सुरू करण्यात आला. त्यास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
कांदा लिलावासाठी यावेळी शेकडो वाहानांनी गर्दी केली होती. शुक्रवारी (दि १२) सकाळी साडे दहा वाजता स्थानिक शेतकऱ्यांनी बैलगाडीतून आणलेल्या कांदा बैलगाडीची पूजा करुन खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभाप्रसंगी कांद्याला १४५१ रूपयाची बोली लावली गेली, गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समितीच्या धरसोड वृत्तीला कंटाळून प्रचलीत लिलाव प्रक्रियेला फाटा देत, शेतकऱ्यांचा एक रुपयाही कपात न करता कांदा लिलाव सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत लिलावासाठी वाहनांची गर्दी झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मशगुल असलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र लक्ष देण्यास वेळच मिळाला नसल्याचे चित्र दिसून आले.
तर गेल्या १२ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती या बंद आहेत व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी व्यापारी व हमाल मापारी तोलाई यांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे बाजार समित्या बंद आहेत व शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी होत आहे. असे असताना मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत मशगुल असलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायलाही वेळ मिळालेला नाही. या ज्वलंत प्रश्नाची तड लावण्याचे धाडस शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवले. त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, कृष्णा जाधव, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माणीक निकम यांनी शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून व्यापारी बांधवांशी चर्चा केली. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून पाठींबा जाहीर करण्यात आला. लिलावात व्यापाऱ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जास्तीत जास्त १४५१, सरासरी १२५० ते १३०० व कमीत कमी ९०० रुपये याप्रमाणे कांदा खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कपात न करता रोख पेमेंट अदा केले आहेत. या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कांदा खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले व व्यापारी व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने विठेवाडी येथील शेतकरी महेंद्र आहेर, कैलास कोकरे, विलास मेधने, संजय सावळे, राजेंद्र जाधव, समाधान निकम आदींसह देवळा तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेतकुर, दीपक गोसावी, मुन्ना शिंदे, दिनकर सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
गेल्या १२ दिवसांपासून बाजार समिती मधील कांदा व्यापार ठप्प असल्याने या काळात जवळपास १२०० ते १३०० कोटीची आर्थिक उलाढाल ठप्प झाली, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी, स्थानिक व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच खाजगी जागेत हे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. – कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता व्यापारी व जागा मालक यांच्याशी समन्वय साधून खाजगी जागेवर कांदा खरेदी सुरु करण्यात आले असून , शेतकऱ्यांकडून कुठलीही कपात केली जाणार नसून , रोख पेमेंट मिळणार आहे . शेतकऱ्यांनी आपला कांदा प्रतवारी करून येथील खाजगी मार्केट मध्ये विक्रीस आणावा. – कृष्णा जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, खर्डे.
हेही वाचा: