नाशिक : कोरोनानंतर वर्षभरातच बालमातांची शंभरी

file photo
file photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना प्रादुर्भाव असताना जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण वाढले होते. त्याचे परिणाम गेल्या वर्षभरात दिसून आले असून, जिल्हा रुग्णालयात 100 बालमातांची प्रसूती करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींवर वेळेआधीच माता संगोपनाची जबाबदारी पडल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात आदिवासी बहुल तालुक्यांमधील बालमातांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. अल्पवयीन मुली जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असून, त्यात त्या गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघड होत आहे. या मुलींवर सुरुवातीस तालुकास्तरावर उपचार केले जातात. मात्र, अल्पवयीन असल्याने त्यांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जाते. त्यानुसार एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत 165 बालमातांची प्रसूती झाली आहे. या तीन वर्षांत बालमातांचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे दिसते. गेल्या वर्षात बालमातांचे प्रमाण 61 टक्क्यांनी वाढल्याची बाब समोर आली आहे. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये बालविवाहाचे प्रकार कायम असल्याने बालमातांचे प्रमाणही वाढते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सर्वच भागात व स्तरात अल्पवयीन मुलींचा विवाह लावून देण्याचे प्रकारही वाढले होते. त्याचप्रमाणे प्रेमप्रकरण, अत्याचारामुळेही अनेक अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्या. त्यामुळे त्यांना कोवळ्या वयातच मातृत्वाची जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींसोबत शरीरसंबंध ठेवणार्‍यांविरोधात पोक्सोनुसार अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पिता कारागृहात अन् आई अल्पवयीन असल्याने नवजात बाळांना सुरुवातीपासून कौटुंबिक, सामाजिक असमतोलाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news