मिरची तिखट का असते? जाणून घ्‍या कारण

मिरची तिखट का असते? जाणून घ्‍या कारण

नवी दिल्ली : अग्नी आणि उष्णता यांचे एक अद्वैतच आहे. तसाच प्रकार मिरची आणि तिखटपणाचा आहे. हिरवी मिरची असो वा लाल मिरची दोन्ही प्रकारच्या मिरच्या या चवीला तिखटच असतात. हिरव्या मिरचीशिवाय स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ तयार होऊ शकत नाही. यामुळे स्वयंपाकात हिरव्या आणि लाल मिरचीला विशेष महत्त्व आहे. विशेषत: पदार्थांची चव वाढवण्यासाठी हिरव्या मिरच्यांचा वापर नक्की केला जातो. हिरवी मिरची जेवणाची चव तर वाढवतेच; पण आरोग्यासाठीही फायदेशीर असते. बहुतेक जण मिरचीचा ठेचा, लोणचे करून खातात; पण तुम्हाला कधी विचार केला का की मिरच्या एवढ्या तिखट का असतात? चला मग यामागचे कारण जाणून घेऊ…

काही मिरच्या इतक्या तिखट असतात की त्या खाल्ल्याने तोंडाची आग होते. डोळ्यातून पाणी वाहू लागते; पण काही मिरच्या अशा असतात ज्या तुम्ही सहजपणे खाऊ शकतात, ज्या खाताना तिखट लागत नाहीत; पण मिरचीत असे काही घटक असतात ज्यामुळे तिचा तिखटपणा अधिक जाणवतो.

मिरचीचा अन्नपदार्थात जास्त वापर केल्यास त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येतात. यामुळे पोटात जळजळ होते, जुलाब यासारख्या समस्या जाणवू लागतात. काही मिरच्या खाल्ल्यानंतर कितीही पाणी प्यायले तरी त्याचा तिखटपणा तोंडातून जात नाही. अनेकदा मिरची हाताने कापली आणि तोच हात जर चुकून डोळ्यांना लागला तर डोळ्यांना होणारी जळजळ असह्य असते. पाण्याने कितीही हात धुतले तरी मिरचीची जळजळ हातावर राहतेच आणि त्रास होतो.

मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे संयुग

मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे संयुग आढळते. त्यामुळे मिरची तिखट होते. मिरचीच्या मधल्या भागात कॅप्सेसिन हा घटक असतो. यामुळे मिरचीला कधी बुरशी येत नाही. कॅप्सेसिन हा घटक जिभेवर आणि त्वचेवर आढळणार्‍या मज्जातंतूंवर प्रभाव सोडतो. कॅप्सेसिन नावाचे रसायन रक्तात सोडते ज्यामुळे मेंदूमध्ये जळजळ आणि उष्णता निर्माण होते. यामुळे मिरची खाल्ल्यानंतर जळजळ जाणवते. कॅप्सेसिन हा घटक विरघळणारा नाही, यामुळे त्याचा तिखटपणा पाणी पिल्यानंतरही जात नाही. मिरची खाल्ल्यानंतर जेव्हा तिखटपणा जाणवतो तेव्हा नेहमी दूध, दही, मध आणि साखर खा. यामुळे तिखटपणा जाणवणार नाही.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news