नाशिक : विनयनगरमधील खासगी जागेवरील नऊ बांधकामे मनपाकडून जमीनदोस्त

नाशिक : विनयनगरमधील खासगी जागेवरील नऊ बांधकामे मनपाकडून जमीनदोस्त
Published on
Updated on

नाशिक/सिडको : पुढारी वृत्तसेवा 

विनयनगर भागातील गट नंबर ८६६ वरील बहुचर्चित जागेवरील अनधिकृतरीत्या बांधकाम केलेल्या १५ पैकी ९ इमारती मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाेलिसांच्या बंदाेबस्तात जमीनदोस्त केल्या. या प्रकरणी साेमवारी दुपारी१२ पर्यंत स्थगितीसाठी प्रयत्न झाले. यातील चार इमारत मालकांनी तात्पुरती स्थगिती मिळवण्यात यश मिळवले. संबंधित बांधकामे वगळून नऊ अतिक्रमणे हटविली.

विनयनगर येथील गट नं. ८६६ भूखंडावरील जागेची विक्री करताना केवळ नोटरी करून गुंठेवारीने सर्रास विक्री करण्यात आली होती. अनेक प्लॉटधारकांनी जागेवर विनापरवानगी बांधकामेही उभी केली होती. फसवणूक करून जागेची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत सकल हिंदू समाज कृती समितीने मनपाकडे पाठपुरावा केल्यानंतर संबंधित भूखंड मालकाला व बांधकाम व्यावसायिकांना अनधिकृत बांधकाम थांबविण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवकांनी आवाज उठवला हाेता. नोटिसा बजावल्यानंतरही अनधिकृत बांधकाम सुरूच होते. बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि बांधकामांविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा सकल हिंदू समाज कृती समितीने निवेदनाद्वारे दिला होता. बांधकाम हटवण्याबाबत मनपाने दिलेल्या नाेटिसांची मुदत संपल्यानंतर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगर नियोजनचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल तसेच सहा विभागांतील प्रमुख अधिकाऱ्यांसह मंगळवारी (दि.७) अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. चार तास ही माेहीम सुरू हाेती. या मोहिमेत अतिक्रमण विभागासह ५० मनपा कर्मचारी तसेच पाेलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह दोन सहायक पोलिस आयुक्त सहा सहायक पोलिस निरीक्षक तसेच १५० पोलिस उपस्थित हाेते. पाच जेसीबी, दोन पोकलॅन यांचा वापर करण्यात आला.

महापालिकेच्या कारवाईविराेधात जिल्हा न्यायालयात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी दावे दाखल केले होते. मात्र, हे सर्व दावे जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले. त्यानंतर काही इमारतीच्या मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी (दि.७) सुनावणी सुरू हाेती. त्यात काही इमारतधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, नगर नियोजन विभागामार्फत संबंधितांना निष्कासन खर्चासह नोटीस देण्यात आलेल्या आहेत. खर्च वसूल करण्यासाठी संबंधितांच्या अन्य मिळकतींच्या सातबाऱ्यावर बाेजा चढविला जाणार आहे.

शहरात अनधिकृत वा अतिक्रमण असलेल्या मिळकती तसेच बांधकामे नागरिकांनी स्वत: काढून घ्यावेत. या पुढे सर्वच ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार आहे.

– करुणा डहाळे, उपआयुक्त, मनपा, नाशिक.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news