नाशिकहून गोवा, नागपूर, अहमदाबादसाठी तिकीट बुकिंग सुरू, १५ मार्चपासून सेवा | पुढारी

नाशिकहून गोवा, नागपूर, अहमदाबादसाठी तिकीट बुकिंग सुरू, १५ मार्चपासून सेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही काळासाठी कोलमडलेली नाशिकची विमानसेवा पुन्हा एकदा झेप घेण्यास सज्ज होताना दिसत आहे. येत्या १५ मार्चपासून इंडिगो कंपनीकडून गोव्यासह नागपूर, अहमदाबाद विमानसेवा सुरू केली जाणार असून, सध्या त्याची तिकीट बुकिंग सुरू आहे. दुसरीकडे ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार स्टार एअरची नाशिक-बेळगाव-नाशिक ही विमानसेवा लांबणीवर पडली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून इंडिगो कंपनीची नाशिकला प्रतीक्षा होती. आता इंडिगो कंपनीने नाशिकमध्ये येण्याचे निश्चित केले असून, १५ मार्चपासून नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जाणार आहे. इंडिगो कंपनीची सेवा व्यावसायिक पातळीवर यशस्वी समजली जाते. त्यामुळे नाशिकमध्ये इंडिगो सेवा देत असल्याने नाशिकच्या विमानसेवेला वेग येण्याची शक्यता आहे. या विमानसेवेमुळे गोव्याला अवघ्या दोन तासांत पोहोचता येणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर शहरांचेही अंतर कमी होणार असल्याने, व्यापार-उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संजय घोडावत समूहाच्या स्टार एअरकडून ३ फेब्रुवारीपासून सुरू होणारी बेळगाव-नाशिक-बेळगाव ही विमानसेवा लांबणीवर पडली आहे. कंपनीने अचानक ऑक्टोबर महिन्यात सुरू असलेली ही नियमित सेवा बंद केली होती. यानंतर नाराजीचा सूर उमटल्याने लोकप्रतिनिधींनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. यानंतर कंपनीने ३ फेब्रुवारीपासून सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली होती. आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा नेमकी केव्हा सुरू होणार याचे चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

गोवा विमानसेवेची मागणी पूर्ण

नाशिकहून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली तेव्हापासूनच गोवा या शहराला जोडणारी विमानसेवा सुरू करावी, अशी सातत्याने नाशिककरांकडून मागणी केली जात होती. अखेर इंडिगो कंपनीच्या माध्यमातून ही सेवा सुरू झाली असून, महाराष्ट्र तसेच गोव्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button