नगर: वृक्षतोडीचा ‘रात्रीस खेळ चाले…!’ ; ग्रामस्थांकडून नुकसान भरपाईसाठी विरोध | पुढारी

नगर: वृक्षतोडीचा ‘रात्रीस खेळ चाले...!’ ; ग्रामस्थांकडून नुकसान भरपाईसाठी विरोध

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर-दौंड महामार्गावर सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामास खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, चिखली ग्रामस्थांकडून नुकसान भरपाईसाठी विरोध होत आहे. खोदकामामुळे रस्त्यावर टाकले जाणार्‍या मातीच्या ढिगार्‍यांमुळे वारंवार होणारे अपघात, शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान, बेसुमार वृक्षतोड यामुळे चिखली ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत गॅस पाईपलाईनचे काम मंगळवारी (दि.7) बंद पाडले.  गॅस पाईपलाईनच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पाईपलाईन खोदकामात अडसर ठरणारे नवे, जुने वृक्ष खुलेआमपणे तोडले जात आहेत. वृक्षतोडीचा रात्रीचा खेळ जोरात सुरू आहे. याकडे जिल्हाधिकारी, वनविभाग सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. जिल्ह्यातून जाणार्‍या गॅस पाईपलाईनचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. त्यासाठी नगर-औरंगाबाद महामार्गावर होणार्‍या खोदकामास तालुक्यातील जेऊर येथील शेतकर्‍यांनी कडाडून विरोध केला. संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे निवेदनही दिले आहे. शेतकर्‍यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
नगर-दौंड महामार्गालगत असणार्‍या वृक्षांची रात्रीतून कत्तल केली जात आहे. शेतकर्‍यांचा विरोध नको, म्हणून रात्री वृक्षतोड केली जात आहे. याबाबत ठेकेदारावर कारवाई होणार का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

गुन्हे दाखल करण्याची धमकी
विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांचा धाक दाखवित गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. दौंड महामार्गालगत रामेश्वर देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवर खोदकाम केले. 50 वर्षापूर्वीचे वृक्ष तोडल्याने चिखली ग्रामस्थांनी चालू असलेले काम बंद पाडले.

ठेकेदारावर कारवाईची मागणी
गॅस पाईपलाईनच्या खोदकामासाठी ठेकेदाराने शेकडो वृक्षांची खुलेआमपणे कत्तल केली आहे. याकडे जिल्हा प्रशासन, वनविभागाचे दुर्लक्ष आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष शरद चोभे यांनी सांगितले.

 

Back to top button