नाशिक : जर्मनीच्या तरुणीला देखील खंडोबा महाराज यात्रोत्सवाचा मोह

नगरसूल : खंडोबा महाराज यात्रोत्सवात  जेनिना कॅक सोबत श्र्वेता पैठणकर, नेते सुनिल पैठणकर , उज्वला पैठणकर तर दुस-या छायाचित्रात बासरी वाजवितांना जेनिना. (छाया: भाऊलाल कुडके )
नगरसूल : खंडोबा महाराज यात्रोत्सवात जेनिना कॅक सोबत श्र्वेता पैठणकर, नेते सुनिल पैठणकर , उज्वला पैठणकर तर दुस-या छायाचित्रात बासरी वाजवितांना जेनिना. (छाया: भाऊलाल कुडके )
नाशिक (नगरसुल) : भाऊलाल कुडके 
खंडोबा महाराज यात्रोत्सव बघण्याचा मोह जर्मनीच्या जेनिना या तरुणीला आवरला नाही. येवला तालुक्यातील नगरसूल राष्ट्रवादीचे नेते सुनिल पैठणकर यांची मुलगी श्र्वेता हीने मास्टर आर्ट करण्यासाठी केरळ येथे गेली होती. तेव्हा जर्मनची जेनीना कॉक सोबत तिची मैत्री झाली. या मैत्रीमध्ये तिने भारतीय संस्कृती बरोबर महाराष्ट्रातील संस्कृती कशी असते याबाबत जेनिनासी  बोलत असतांना गावाकडील खेड्यांच्या संस्कृती कशी असते. शेतमळा, विहीर, बागायत तिथे मिळणारे अन्नधान्य कसे मिळते याबाबत माहिती सांगत असताना जेनीना कॉकला महाराष्ट्रात येण्याची ओढ लागली. त्यावेळी कोरोना कालावधी सुरु असल्याने  जेनिना जर्मनला मायदेशी परत निघून गेली होती. जेनिना व श्र्वेता यांच्या मैत्रीची नाळ घट्टच असल्याने जेनीनाने पुन्हा भारतात आल्यावर  श्र्वेता पैठणकर हीला संपर्क साधत इच्छा व्यक्त करत महाराष्ट्रात येण्याचे सांगितले. त्यानुसार नगरसुल गावात नुकतेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रा सुरु असल्याने जेनीनाला या यात्रेचा मनसोक्त आनंद लूटता आला आहे.
नगरसूल येथील श्वेता पैठणकर या मैत्रिणीसोबत यात्रेत दाखल होऊन खंडोबाचरणी ती देखील नतमस्तक झाली. लाखो यात्रेकरूंच्या उपस्थितीत होणारा बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम, पालखी व कावडी मिरवणूक, वाघ्या-मुरळींचे जागरण, आदिवासी नृत्य आदी पारंपरिक कार्यक्रमांना हजेरी लावून यात्रोत्सवाचा तिने मनसोक्त आनंद लुटला. यात्रेकरूंसोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा गजर करून जेनिनाने भंडाऱ्याचीही उधळण केली. यात्रोत्सवामधील परंपरा बघून खूप आनंद झाल्याची भावना जेनिनाने बोलून दाखविली. परदेशी पाहुणी यात्रेत दाखल झाल्यानंतर मंदिरातील पुजारी दत्तू भडके व नगरसूलकरांनी परदेशी पाहुणी जेनिनाचे जल्लोषात स्वागत केले. यात्रेत विक्रीसाठी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, मिठाई, जिलेबी तयार करण्याच्या पद्धतीचे तिने बारकाईने निरीक्षण करत स्वत: देखील जिलेबी बनवण्याचा आनंद घेतला. वडापाव, जिलबी, पाणीपुरी, उसाचा रस आदींचा आस्वाद घेतला. रहाट पाळण्यात बसण्याचा आनंदही मैत्रिणीसोबत या परदेशी पाहुणीने लुटला. दोन दिवसांच्या या यात्रोत्सवात परदेशी पाहुणी अवतरल्याने गावात औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news