Nashik Election | शिक्षक मतदारसंघासाठी दराडे, गुळवे, हिरे तयारीत ; शिक्षण संघटनांच्या माध्यमातून भेटीगाठींवर जोर

Nashik Election | शिक्षक मतदारसंघासाठी दराडे, गुळवे, हिरे तयारीत ; शिक्षण संघटनांच्या माध्यमातून भेटीगाठींवर जोर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. १० जून रोजी मतदान, तर १३ जूनला मतमोजणी असणार आहे. जिल्ह्यासह विभागाचा समावेश असलेल्या या मतदारसंघामध्ये जिल्ह्यातून विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यासह मविप्रचे संचालक संदिप गुळवे, महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे डाॅ. अपूर्व हिरे या तिघांची नावे सध्या तरी चर्चेत आहे.

आमदार दराडे यांच्यासह गुळवे, हिरे यांच्यासह अनेक इच्छूक तयारीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिक्षण संघटनांच्या भेटीगाठीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानपरिषदेच्या १/१२ जागा शिक्षक मतदारसंघातून भरल्या जातात. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत माध्यमिक-सेंट्रल स्कूल, डिग्री कॉलेज, मेडीकल कॉलेज, पॉलिटेक्निक आणि इंजिनियरिंग कॉलेजचे शिक्षक मतदान करू शकतात. कमीत कमी तीन वर्ष शिकवण्याचा अनुभव असलेलेच मतदान करू शकतात. निवृत्त झालेले शिक्षकही निवृत्तीनंतर तीन वर्षापर्यंत मतदान करू शकतात.

नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण विभाग पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे व मुंबई विभागाचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ ला संपत आहे. त्यामुळे २०१८ प्रमाणेच आता जून २०२४ मध्ये सहा वर्षे पूर्ण होत असल्याने येथील निवडणुका लवकरच होणार आहे.

२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथील शिक्षक नेते किशोर दराडे यांनी एकतर्फी विजय संपादन केला होता. त्या वेळी पाचही जिल्ह्यातल्या शिक्षकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. यंदा ही निवडणुक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. पाच वर्षांत शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासह प्रत्येक शाळेला विविध शैक्षणिक वस्तू देऊन नावलौकिक झाल्याने स्वतः आमदार दराडे पुन्हा निवडणुकीच्या तयारीत आहेत.

५३ हजार ५१८ मतदार

डिसेंबर महिन्यातच विभागातील पाच जिल्ह्यातील ५३ हजार ५१८ मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक १७ हजार ९६३ मतदारांची तर, नगर जिल्ह्यात १३ हजार ४२१, नंदुरबार जिल्ह्यात ३ हजार ४४३, धुळे जिल्ह्यात ७ हजार ३९२ व जळगाव जिल्ह्यात ११ हजार २९९ मतदारांची नोंद झाली आहे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news