नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील 1280 हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात 2402 शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, 43 गावांतील पिकांचे 33 टक्क्यांंपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यांना 2 कोटी 19 लाख 46 हजार 875 रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे. महसूल विभागाने तसा अहवाल जिल्हाधिकार्यांना पाठविला आहे.
महसूल विभाग, तालुका कृषी विभाग व पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत तसेच ग्रामसेवकांच्या संयुक्त पाहणीतून पंचनाम्याचे काम पार पडले. नुकसानीचे जीपीएस छायाचित्र काढण्यात आले. एप्रिल महिन्यात तालुक्यात आठ दिवस विविध गावांत वादळी वार्यासह गारपिटीने नुकसान झाले. मार्च महिन्यात फळपिकांना नगण्य स्वरूपाचा फटका बसला होता. तथापि, एप्रिल महिन्यातील अवकाळीने 32 शेतकर्यांच्या 31 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले. द्राक्ष, आंबा, चिकू, पेरू, डाळिंब या फळपिकांचा यात समावेश आहे. सर्वाधिक द्राक्षबागांना फटका बसला आहे. सहा लाख 97 हजार रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे. सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही. त्यांना लवकरच मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदूरशिंगोटे येथील कार्यक्रमात दिले होते. आता त्यास महिना उलटला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाचा अहवालही सरकारला सादर झाला आहे. मात्र, शेतकर्यांना अजून एक रुपयाची मदत मिळालेली नाही. मार्च महिन्यात 26 गावांतील 105 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. 311 शेतकर्यांना 28 लाख 77 हजार 880 रुपयांची मदत मिळणे अपेक्षित आहे. ही मदत अजूनही मिळाली नाही तोच एप्रिल महिन्याच्या अवकाळीने झालेल्या नुकसानीची त्यात भर पडल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
कांद्याचे सर्वाधिक 911 हेक्टर क्षेत्र बाधित
तालुक्यात काढणीला आलेल्या उन्हाळ कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले. कांद्याचे सर्वाधिक 911 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्या खालोखाल विविध प्रकारच्या 191 हेक्टरवरील भाजीपाला पिकांना फटका बसला. गव्हाचे 22, मक्याचे 99 तर बाजरीचे 24 हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त झाले. आगासखिंड, पांढुर्ली, विंचूरदळवी, शेणीत, नांदूरशिंगोटे, चास, चापडगाव, दापूर, ठाणगाव, बेलू, कोनांबे, सोनांबे, डुबेरे, आटकवडे, पाडळी या भागांत सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसून आले.