Nashik Crime : तरुणीने लग्नाला नकार दिल्याने सात वाहनांची जाळपोळ

Nashik Crime : तरुणीने लग्नाला नकार दिल्याने सात वाहनांची जाळपोळ
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे परिसरात दहशत पसरविण्याच्या प्रयत्नातून दोन माथेफिरूंनी तब्बल सात वाहनांची जाळपोळ केली. हा प्रकार समोर येताच भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासांतच या दोघांच्याही मुसक्या आवळल्या. जाळपोळ केलेल्या वाहनांमध्ये चारचाकी, रिक्षा व दुचाकींचा समावेश आहे.

संशयित सुमित पगारे (रा. धम्मनगर, कथडा) याने तरुणीशी ओळख वाढवून संबंध प्रस्थापित केले होते. त्याने तिला विवाहाची मागणी घातली होती. मात्र, तिने विवाहाला स्पष्ट नकार दिल्याचा त्याला राग आला. मंगळवारी (दि. १४) मित्र संशयित विकी जावरे (रा. काठे गल्ली) याच्या मदतीने त्याने तरुणीच्या दुचाकीसह परिसरातील अन्य दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांची जाळपोळ करून नुकसान केले. सर्वप्रथम संशयितांनी मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास अपार्टमेंटबाहेर बसलेल्या तरुणीच्या भावाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर पहाटे 3.30 च्या सुमारास पुन्हा त्या ठिकाणी येऊन वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळपोळ केली. यावेळी दोघांनीही आरडाओरड केल्याने अपार्टमेंटमधील काही रहिवासी पार्किंगमध्ये आले असता, त्यांना जळत असलेली वाहने दिसली. स्थानिकांनी पाण्याच्या सहायाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बहुतांश वाहने जळून खाक झाली होती.

अपार्टमेंटच्या पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे संशयित वाहनांची जाळपोळ करताना चित्रित झाले आहेत. त्यावरून भद्रकाली गुन्हे शोध पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासांत दोघांनाही ताब्यात घेतले आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस पेट्रोलिंगचा अभाव

सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून पेट्रोलिंग केली जात असल्याचे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात पोलिस पेट्रोलिंगचा या ठिकाणी अभाव दिसून आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दरम्यान, संशयितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या वाहनांची केली जाळपोळ

दुचाकी : एमएच १५ जेबी ३६२४, एमएच १५ एफए ७०८९, एमएच १९ एझेड २३२९, एमएच १५ डीव्ही ७६१९, एमएच १५ ईजी ०१३३

चारचाकी : एमएच १५ जेडी २२६८

रिक्षा : एमएच १५ एफयू ७४५७

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news