हिंगोली: नर्सी येथे महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ठिय्या | पुढारी

हिंगोली: नर्सी येथे महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ठिय्या

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील नर्सी नामदेव येथील ३३ के व्ही उपकेंद्राअंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी २४ तासांमधून सलग दोन तासही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी महावितरण उपकेंद्रासमोर तीन तास ठिय्या आंदोलन केले.

नर्सी नामदेव येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधून नर्सीसह परिसरातील जवळपास १५ गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून यासाठी शेतकरी गहू, हरभरा, तूर या पिकांना पाणी देत आहे. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत.

अगोदरच २४ तासांपैकी केवळ दोन तीन तासच वीज पुरवठा होत असून त्यामध्ये देखील अनेक वेळा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. शिवाय रोहीत्र देखील जळत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महावितरणच्या या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

यावेळी ठिय्या आंदोलन केल्यानंतर कार्यकारी अभियंता रविंद्र मुदागरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.

यावेळी शेतकरी रमेश शिंदे, बंडूभाऊ मुटकुळे, भिकाजी कदम, दत्तराव जाधव, बद्रीनाथ घोंगडे, मदन लोथे, एकनाथ शिंदे, गजानन डांगे, वैजनाथ डांगे, हिंमत तावरे, दत्तराव तावरे, बद्री शिंदे, नागेश गायकवाड, विजय भोने, जगन पाटील, माधवराव पवार, बबन सावंत, शंकर काळे, जेजेराम मुटकुळे, सत्यनारायण उपाध्याय, शिवाजी पाटील, बंडू गुगळे, जेगण मुटकुळे पाटील, दत्तरावजी जाधव आदीसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button