नाशिक : पुढारी वृत्तसेवा– कोरोनाविरोधातील लढ्यासाठी नाशिक महानगरपालिका सज्ज झाली आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय तसेच जुन्या नाशकातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोनाचा विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर बिटको रुग्णालयातील मॉलिक्युलर लॅबही सुरू केली आहे. कोरोनाबद्दल लोकांच्या मनात अद्यापही भीती कायम असल्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांनी पहिल्या दिवशी चाचण्यांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. (Nashik Corona Update)
दीड वर्षानंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. केरळनंतर महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नाशिक महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालिकेच्या सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डॉ. झाकिर हुसेन व बिटको रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. कोरोना चाचण्यासाठी बिटको रुग्णालयातील मॉलिक्युलर लॅब शुक्रवार (दि.२२)पासून कार्यान्वित केली आहे. तसेच संशयित रुग्णांच्या चाचण्याही शुक्रवारपासूनच सुरू केल्या आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्णसंख्या वाढल्यास त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय विभागाने शुक्रवारी (दि. २२) बैठक घेत, शहरातील एकूण रुग्णालये, उपलब्ध बेड, ऑक्सिजन सिलिंडर, पीपीई किट, चाचण्यासाठी आवश्यक अॅन्टिजेन किट यांच्यासह आवश्यक औषधसाठ्याचा आढावा घेतला. त्यानुसार सध्या पालिकेकडे चाचण्यासाठी आवश्यक अॅन्टिजेन किट उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली आहे.
पहिल्या दिवशी निरंक चाचण्या (Nashik Corona Update)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने शुक्रवारपासून कोरोना चाचण्यांना सुरुवात केली. बिटको रुग्णालयात सर्दी, ताप, डोकेदुखीच्या उपचारासाठी ओपीडीत आलेल्या रुग्णांची चाचणी घेण्याचा प्रयत्न वैद्यकीय विभागाने केला. परंतु, रुग्णांकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे शुक्रवारी पहिल्या दिवशी एकही चाचणी घेणे शक्य झाले नाही.
नागरिकांना कोरोनाबाबत भीती बाळगू नये. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास चाचणी करून घ्यावी. रुग्णालयात उपचार घ्यावेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा.
– डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
हेही वाचा :