शहरातील गतिरोधकांचा महापालिका करणार सर्व्हे | पुढारी

शहरातील गतिरोधकांचा महापालिका करणार सर्व्हे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाहनचालकांच्या पाठदुखीसाठी रस्त्यावरील खड्डे जितके कारणीभूत आहेत, तितकेच शहरातील अशास्त्रीय गतिरोधकही आहेत. त्यामुळे शहरातील गतिरोधकांचा सर्व्हे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या माध्यमातून अशास्त्रीय गतिरोधक काढून टाकण्यात येणार आहेत. वाहनांची गती कमी करण्यासाठी महापालिकेने शहरातील दीड हजार कि.मी. रस्त्यांवर दोन हजारापेक्षा अधिक गतिरोधक तयार केले आहेत.

सुरुवातीची काही वर्षे इंडियन रोड काँग्रेसच्या मानकानुसारच गतिरोधक उभारण्यावर भर देण्यात आला. परंतु रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरणानंतर अनेक ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधक उभारण्यात आले. दुचाकीचालकांना पाठीच्या दुखण्याचा त्रास सोसावा लागत आहे. गतिरोधकांजवळ पाणी साठून ते रस्त्यात मुरून खड्डे पडत आहेत. काही ठिकाणी गतिरोधकांच्या अडथळ्यांमुळे पावसाचे पाणी गटारांमध्ये जात नाही. न्यायालयानेही इंडियन रोड काँग्रेसच्या मानकानुसार गतिरोधक उभारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

सर्व्हेच्या माध्यमातून कोणते गतिरोधक नियानुसार आहेत, कोणते गतिरोधक चुकीचे आहेत, आणि कोणते गतिरोधक दुरुस्त करता येतात, हे निश्चित केले जाणार आहे. त्यानंतर काही गतिरोधक काढून टाकले जातील तर काही गतिरोधक दुरुस्त केले जातील. तसेच गतिरोधकांसाठी मोबाईल अ‍ॅप विकसित करून गतिरोधकांचे ट्रॅकिंग केले जाणार आहे.

– निखिल मिजार, वाहतूक व्यवस्थापक, पथ विभाग, महापालिका.

हेही वाचा

Back to top button