नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीण पोलिस दलात काही दिवसांपूर्वी अंमलदारांच्या बदल्या जाहीर झाल्या. त्यात पसंतीक्रमापैकी भलतेच पोलिस ठाणे मिळाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. घरापासून दूरचे पोलिस ठाणे मिळाल्याने पोलिसांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे सुमारे २०० पोलिसांनी वरिष्ठांची भेट घेत त्यांच्या समस्या सांगत बदल्यांबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली. त्यानुसार काही जणांच्या बदल्यांबाबत फेरआढावा होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण पोलिस दलातील एक हजार ९१ अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच निघाले. मात्र विनंती बदल्या किंवा पसंती क्रमाने दिलेल्या पोलिस ठाण्यात बदली न झाल्याने बहुतांश पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नाराजांपैकी काहींनी पोलिस अधीक्षकांची भेट घेत बदल्यांबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली, तर अंमलदारांनी पसंतीक्रमात शहरानजीकचेच पोलिस ठाणे दिले, मात्र तेथील मनुष्यबळ पूर्ण असल्याने पसंतीनुसार बदली न केल्याचे अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
शहरानजीक सर्वांची पसंती
अंमलदारांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर, घोटी, वाडिवऱ्हे, पिंपळगाव, सायखेडा या शहरानजीकच्या पोलिस ठाण्यांना बहुतांश पसंती असल्याचे दिसून आले. तर जिल्ह्याच्या वेशीवरील किंवा तालुक्यामधील अनेक पोलिस ठाण्यांना पसंती देण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे मालेगावसाठी एकही अर्ज आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूकमध्ये बदलीसाठी शिफारशी केल्या. मात्र या बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेसह वाहतूकमध्ये यंदा कोणालाही नियुक्ती दिलेली नाही. तिथे अतिरिक्त असणाऱ्यांनाच इतर पोलिस ठाण्यात नियुक्त करीत पोलिस ठाण्यांचे बळ वाढवण्यावर भर दिला आहे.
हेही वाचा :