पाटण, गणेशचंद्र पिसाळ : कोयना धरणांतर्गत विभागातील जलविद्युत प्रकल्पांना पाणी पुरवणार्या इंटेक टनेल तसेच लेक टॅपिंगचा बहुतांश भाग पाण्याने तळ गाठल्याने उघड्यावर पडला आहे. एका बाजूला पाण्याअभावी गंभीर परिस्थिती निर्माण होत असताना दुसरीकडे पाण्याखाली असलेल्या यंत्रणा उघड्यावर पडल्याने त्याची सद्यस्थिती समोर आली आहे. तब्बल साठ वर्षांपूर्वीच्या या यंत्रणात कालानुरूप अनेक बदल झाल्याने आता याबाबतचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे महत्त्वाचे बनले आहे.
या तांत्रिक व नैसर्गिक संधीचा लाभ घेऊन संबंधित विभागाकडून याची तपासणी व गरज असेल त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना झाल्या तर धरण सार्वत्रिकदृष्ट्या सुरक्षित होईल. यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत जलतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
कोयना धरण शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने तापोळा ते कोयना धरणाच्या भिंतीच्या ठराविक अंतरापर्यंतचा सर्व भूभाग कोरडा पडला आहे. यातूनच धरणांतर्गत जलविद्युत प्रकल्पांना पाणी पुरवठा करणार्या यंत्रणाही उघड्यावर पडल्याने त्यांची वस्तुस्थितीही समोर येत आहे. पश्चिमेकडील जलविद्युत प्रकल्पांसाठी पाणीपुरवठा करणार्या पोफळी, अलोरे व कोयना चौथा टप्पा या प्रकल्पांसाठी पाणीपुरवठा करणार्या पहिल्या व दुसर्या लेक टॅपिंगची जागा, पोफळी टप्पा एक व दोनसाठी पाणीपुरवठा करणार्या इंटेक टनेलची अवस्था जवळपास तशीच पहायला मिळत आहे.
पाण्याखालचा हा भू-भाग व यंत्रणा उघड्या पडल्या असून त्या ठिकाणच्या सुरक्षित भिंतीसह साठ वर्षांपूर्वी केलेले काँक्रीट, लोखंडी फाटक दरवाजांची उघडझाप त्या- त्या वेळी न झाल्याने त्याची सडलेली व गंजलेली अवस्था, भूकंपात अंतर्गत काँक्रीटला गेलेले तडे, काँक्रीटची कमी झालेली ताकत व मोठ्या प्रमाणावर चिरा पडल्याने जमिनीत पाणी झिरपण्याचे वाढलेले प्रमाण, अंतर्गत बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पडलेले मोठे,दगड माती. आदींमुळे अनेक ठिकाणी बांधकामाची अवस्था दयनिय झाल्याचे पहायला मिळत आहे. गतवर्षी सर्जवेल तथा उल्लोळक विहिरीचा गंभीर प्रश्नदेखील अचानकपणे समोर आला होता. धरणाला भगदाड अशा चर्चांना ऊत आला होता. घटनेचे गांभिर्य समोर आल्यावर शासनाला जाग येऊन त्याची निविदाही काढण्यात आली.
धरणांतर्गत सध्या पाण्याअभावी ज्या यंत्रणा उघड्यावर पडल्या आहेत त्याची तातडीने युद्धपातळीवर तपासणी झाली तर निश्चितच वस्तुस्थिती समोर येईल. शक्य असेल व छोट्या प्रमाणात काम असेल तर तातडीने कमी खर्चात ते पूर्णत्वाला नेले जाऊ शकते. याशिवाय त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असेल तर यावर्षी तपासणी करून अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करून त्यासाठी प्रशासकीय तरतुदी करून आगामी काळात धरणात पाणीसाठा कमी होईल किंवा वेळप्रसंगी या कामासाठी पाणी कमी करून अंतर्गत कामे केली तर निश्चितच धरण सर्वच बाजूंनी सुरक्षित होईल. यासाठी शासन व प्रशासनाकडून तातडीने गंभीर दखल घेण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात धरणाला किंवा जलविद्युत प्रकल्पांना मोठा धोका निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी राज्यकर्ते शासन व प्रशासन जबाबदार राहील याचाही विचार होणे गरजेचे आहे.
कोयना धरण परिसरात अद्याप पाऊस सुरू नाही. त्यामुळे प्रशासनाला काम करताना फारशा अडचणी येणार नाहीत.
(पूर्वार्ध)