नागपूरः अरुण गवळीला पॅरोल मंजूर; पोलीस संरक्षणाविना मुंबईत येणार

नागपूरः अरुण गवळीला पॅरोल मंजूर; पोलीस संरक्षणाविना मुंबईत येणार

नागपूरः पुढारी वृत्तसेवा: नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळीला अखेर पॅरोल मंजूर झाला आहे. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी पोलीस संरक्षणाविना बाहेर जाणार आहे. १७ नोव्हेंबरला अरुण गवळीच्या मुलाचे लग्न असून त्यासाठी त्याने पॅरोलची मागणी केली होती. चार दिवसांचा पॅरोल मंजूर झाला असून पोलिसांच्या सुरक्षेशिवाय मुंबईला जाता येईल, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या संरक्षणात गवळीने मुंबईला जावे, अशी अट कारागृह प्रशासनाने घातली होती. मात्र, याचा खर्चही गवळीलाच करावा लागेल, अशी अट होती. या विरोधात अरुण गवळीने न्यायालयात दाद मागितल्यावर पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाता येईल, असा निर्णय न्यायालयाने दिला.

शिवसेनेचे घाटकोपरमधील तत्कालीन नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने अरुण गवळी आणि इतर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. मागील अनेक वर्षांपासून गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. ८ दिवसांचा पॅरोल गवळीने मागितला असला तरी न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर केवळ ४ दिवसांचाच पॅरोल मंजूर केला आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news