नागपूर : पूर्वीच्या सरकारचे सगळे निर्णय बदलणे योग्य नाही; शरद पवार यांची टीका

नागपूर : पूर्वीच्या सरकारचे सगळे निर्णय बदलणे योग्य नाही; शरद पवार यांची टीका

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सध्याचे सरकार एकेक करून आधीच्या सरकारचे सगळे निर्णय बदलत आहे. ही गोष्ट राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना केली. सरकार आल्याच्या नंतर नवीन काय करत आहात हे दाखवले असते तर मी त्यांचे अभिनंदन केले असते. पण त्याऐवजी पूर्वीच्या सरकारने घेतलेले एकेक निर्णय रद्द करणे यावरच मोठे काम करत आहात. हे दाखवण्याचा प्रयत्न राज्याच्या दृष्टीने चांगला नाही, असे पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सध्याचे सरकार फडणवीस चालवित आहेत. एकनाथ शिंदे हे खरे मुख्यमंत्री नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर बोलत असताना राऊतांच्या मताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले. संजय राऊत यांनी यापूर्वी या दोघांबरोबर काम केले आहे. दोघेही त्यांचे सहकारी होते. त्यामुळे कोणाची राज्य चालवण्याची कुवत काय आहे, या सगळ्या विषयीची माहिती व ज्ञान आमच्यापेक्षा राऊतांना अधिक आहे. ज्ञानी लोकांच्या मतांकडे दुर्लक्ष करावे असे मला वाटत नाही.

शिवसेनेने भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठींबा दिला आहे. यावर प्रत्येक राजकीय पक्षाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे पवार म्हणाले. संसदेत विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जाऊन निदर्शने करतात. त्यावरही बंदी आणलेली आहे. हे सहन करणार नाही. हा निर्णय करताना कोणाला विश्वासात घेतले होते का हे तपासून पाहावे लागेल. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात यावर बैठक घेऊन निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

महापालिकेसह आगमी सर्व निवडणूका तीनही पक्षांनी एकत्र लढवाव्या असे माझेही मत आहे. पण, शिवसेना आणि काँग्रेसशी चर्चा करून सहमतीने निर्णय घ्यावा लागेल. निवडणूका एकत्र लढल्यास लोकांना हवा तसा निर्णय घेण्याची संधी मिळेल. या विषयावर सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ असे पवार म्हणाले. मंत्रिमंडळाचा अजून विस्तार झालेला नाही. दोघेच जण सरकार चालवित आहे. इतके दिवस उशिर योग्य नाही. अतिवृष्टीसारखे प्रश्न समोर असताना मंत्रिमंडळ स्थापन व्हायला हवे होते, असे पवार म्हणाले. बांठीया आयोगाचा अहवाल अजून हातात आलेला नाही. त्यात एखादा निर्णय चुकीचा असल्यास विरोध करू.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news