मुंबई : वानखेडेवर कोण खेळणार? पाऊस की खेळाडू

मुंबई : वानखेडेवर कोण खेळणार? पाऊस की खेळाडू
Published on
Updated on

मुंबई : संदीप कदम :  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गेले काही दिवस पाऊस पडत आहे. याचा परिणाम आजपासून सुरू होणार्‍या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यावर होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आजही पावसाचा इशारा दिला असल्यामुळे कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा खेळ होणार की प्रेक्षकांना क्रिकेटचा खेळ पाहायला मिळणार हा प्रश्न आहे.

मुंबईमध्ये बर्‍याच काळापासून पाऊस सुरू आहे. बुधवारीदेखील पूर्ण दिवस पाऊस होता. त्यामुळे दोन्ही संघांना सरावदेखील करण्यास मिळाला नव्हता. गुरुवारीदेखील 'आऊटफिल्ड' ओली होती. त्यामुळे दोन्ही संघांनी वांद्रे कुर्ला संकुल येथे सराव केला. सामन्याच्या पहिल्या दिवशीदेखील पावसाची शक्यता आहे. सध्याची वानखेडेची खेळपट्टी पाहता त्यावर गवत दिसत नाही. त्यामुळे मध्यमगती गोलंदाज आणि फिरकीपटू यांना मदत मिळण्याची शक्यता आहे.

पाऊस झाला तरीही गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. सलग पडणार्‍या पावसामुळे खेळपट्टी ही झाकून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे खेळपट्टीत असलेल्या ओलाव्यामुळे गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता अधिक आहे. भारतीय संघ व्यवस्थापन हे बदल करण्याच्या बाजूने नसते; पण दोन खेळाडू धावा करीत नसल्याची समस्या प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासमोर आहे.

कानपूर कसोटी सामन्यात पदार्पणातच 105 आणि 65 धावांची खेळी करणार्‍या श्रेयस अय्यरची जागादेखील निश्चित नाही. अजिंक्य रहाणेने सलग 12 डावांत धावा केलेल्या नाहीत. त्यातच गेल्या लढतीत तो संघाचा कर्णधार होता. त्यामुळे अजिंक्यला घरच्या मैदानावर संधी न दिल्यास व्यवस्थापनाला टीकेला सामोरे जावे लागू शकते.

चेतेश्वर पुजाराचा फॉर्मदेखील चांगला नाही तरीही त्याला संधी मिळू शकते. शुभमनने पहिल्या लढतीत अर्धशतक झळकावले होते आणि भविष्याकडे पाहता त्याला संघात स्थान मिळू शकते. मयंक अग्रवालला बाहेर केले जाणे जवळपास निश्चित समजले जात आहे. मग गिलसोबत डावाची सुरुवात कोण करणार हा एक प्रश्न आहे.

चेतेश्वर पुजारा किंवा यष्टिरक्षक फलंदाज के. एस. भरतला ही जबाबदारी दिली जाऊ शकते. भरतने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत आणि 308 त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो साहाच्या जागी खेळू शकतो. इशांत शर्माचा फॉर्म पाहता मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news