राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाची मराठवाडा पाटबंधारे विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. धरण साठा व समन्यायी संदर्भात मुळातून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत हालचालींना वेग येणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे धरण पूर्ण क्षमतेने भरले नसताना दुसरीकडे समन्यायीची टांगती तलवार पाहता यंदा मुळा धरण क्षेत्रावर दुष्काळाची गडद छाया निर्माण झालेली आहे. 15 ऑक्टोंबर पर्यंत असलेला पाणीसाठा लक्षात घेऊनच समन्यायीबाबत सविस्तर माहिती जाहिर होईल, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रावर वरूणराजाने अवकृपा दाखविली. बहुतांश मान्सून काळ कोरडा ठरल्याने शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे. 26 हजार दलघफू क्षमता असलेला धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरलाच नाही. गणरायाच्या आगमनानंतर काहीसा काळ परतीचा पाऊस बरसला. परंतु अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने धरण साठ्यात वाढ झालीच नाही.
संबंधित बातम्या :
धरणसाठा 23 हजार 897 दलघफू पर्यंतच थबकला आहे. धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर परतीच्या पावसाने पूर्णपणे उघडिप घेतली आहे. धरण साठ्यामध्ये पाण्याची वाढ होण्याची चिन्हे नसल्याने यंदा मुळा धरण भरणार नाही, अशी धारणा लाभार्थ्यांची निर्माण झालेली आहे. मागिल वर्षी 10 हजार दलघफू इतके अतिरीक्त पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेन वाहिला होता. परंतु यंदा मुळा धरण भरलाच नसल्याने धरणाचे दरवाजे उघडलेच नाही.
नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जलस्त्रोत असलेला मुळाचा पाणीसाठा 91 टक्के इतकाच असल्याने शेतकर्यांच्या पाण्यावर गंडांतर येणार असल्याने शेतकरी चिंताक्रांत होते. त्यातच समन्यायीची टांगती तलवार शेतकर्यांसह मुळा धरणाच्या पाण्यावर येऊन ठेपली आहे. त्यानुसार मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी नगर जिल्ह्यात भेट देत पाण्याची आकडेवारी संकलित केल्याची माहिती मिळाली आहे. जायकवाडी पाटबंधारे अधिकार्यांनी मुळा धरणावर भेट देत पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करीत आकडेवारी घेतली आहे. त्यामुळे समन्यायीची टांगती तलवार यंदा धरण लाभार्थ्यांवर पडणार हे निश्चित झाल्याचे चित्र आहे.
याबाबत मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे यांनी मुळा धरणाचे खरीप व रब्बी आवर्तन निश्चिती तसेच पाण्याच्या नियोजनाबाबत बैठकीची पूर्वतयारी केली आहे. जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याबाबत चर्चा सुरू असताना मुळा पाटबंधारे विभागाच्या बैठकीकडे शेतकर्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
15 ऑक्टोंबर नंतर मुळा पाटबंधारे विभागाकडून बैठक घेतली जाणार आहे. 15 ऑक्टोंबरचा साठा हा धरणाच्या पाणी आरक्षण निश्चितीसाठी महत्वाचा असतो. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. 2 हजार दलघफू पेक्षा अधिक कमी पाणी असल्याने शेतकर्यांचे आवर्तन कापले जाणार हे निश्चित होते. त्यानंतर समन्यायीचा कायदा लागू झाल्यास धरणातून जेवढे पाणी सोडले जाईल, तेवढेच नुकसान शेतकर्यांचे होणार आहे. त्यामुळे मुळा पाटबंधारे विभागाकडून पाण्याची आकडेवारी व पाण्याचे आरक्षण जाहिर होण्याबाबत सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बैठकीमध्ये पाण्याची आकडेवारीनुसार जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतले जाणार आहे. धरणाचे दरवाजे उघडून किती पाणी सोडले जाईल हे बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांच्या बैठकीकडे नजरा लागलेल्या आहेत.
15 ऑक्टोबरनंतरच योग्य निर्णय
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले की, जायकवाडी धरण पाटबंधारे अधिकार्यांनी मुळा धरणाची प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. दोन्ही विभागाकडून आकडेवारीची माहिती देवाण-घेवाण झाली आहे. 15 ऑक्टोंबर रोजीचा पाणी साठा ग्राह्य धरून आगामी काळातील पाणी नियोजन जाहिर करू, असे पाटील यांनी सांगितले.