नाशिक, पुढारी वृत्तसेवा : आठ हजार जागांच्या मेगाभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (mpsc) घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेमधील प्रश्न, विषय यांच्या नव्या पॅटर्नने परीक्षार्थीना घाम फोडल्याचे चित्र होते. तसेच सामान्य विज्ञान विषयाचे प्रश्न आणि उत्तरे हे दोन्ही इंग्रजीमध्ये असल्याने एमपीएससीला मराठीमध्ये पर्यायी शब्द सापडले नाही का? अशी देखील चर्चा परीक्षा केंद्रांवर होती.
राज्य शासनातील विविध संवर्गांतर्गत एकूण ८ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी जानेवारीमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. पहिल्यांदाच गट 'ब' आणि गट 'क'साठी एकत्रित पूर्वपरीक्षा होत असल्याने परीक्षेचा पॅटर्नही वेगळा होता. दरम्यान, जिल्ह्यातील ७० केंद्रांवर रविवारी (दि. ३०) पूर्वपरीक्षा घेण्यात आली. दरम्यान, शहरातील अनेक केंद्रांवर बायोमेट्रिक आय स्कॅन करत असताना थोडा गोंधळ उडाला होता. केंद्रप्रमुखांनी लक्ष घालत मार्ग काढला. परीक्षेसाठी यापूर्वी अभ्यासक्रम आणि गुणांनुसार विषयांचे वर्गीकरण ठरलेले होते. मात्र, यंदा आयोगाने पूर्वीचा पॅटर्न (mpsc syllabus) बदलत नवीन वर्गीकरण केल्याने विद्यार्थ्यांना या नव्या पॅटर्नने घाम फोडला होता.
इतिहास – १० गुण, भूगोल – १० गुण, अर्थव्यवस्था – १५ गुण, चालू घडामोडी – १५ गुण, राज्यव्यवस्था – १५ गुण, विज्ञान १५ गुण, गणित आणि बुद्धिमत्ता – २० गुण