दौंडचा निकाल राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा | पुढारी

दौंडचा निकाल राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा

उमेश कुलकर्णी

दौंड (पुणे): दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावरून आतातरी राष्ट्रवादी काँग्रेसने फाजील आत्मविश्वास सोडावा, अशी अपेक्षा पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. दौंड तालुका तसा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. शरद पवार व अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग येथे होता. परंतु, पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीच बारामतीकरांच्या मनात पक्षातील काही जणांबाबतीत स्वतःच्या स्वार्थापाटी विष पेरले. तिथूनच हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लागायला सुरुवात झाली.

प्रथम राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय समाज पक्षाचा मार्ग धरला व त्यावर ते निवडूनसुद्धा आले. नंतर पुढच्या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासूनच दौंड तालुक्यात भाजप ग्रामीण भागामध्ये वेगाने वाढू लागला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निर्विवादपणे वर्चस्व असणार्‍या राष्ट्रवादीला चांगलाच झटका बसला व फाजील आत्मविश्वास नडला तसेच पक्षांतर्गत गटबाजीचा फटका देखील त्यांना बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, हे अनेकदा त्यांच्या नेत्यांना सांगितले गेले होते. परंतु, त्यांनी स्वार्थापोटी दौंड तालुक्यातील गटबाजीकडे लक्ष दिले नाही.

राष्ट्रवादीला बसलेला हा फटका बारामतीकरांना आगामी लोकसभेकरिता नक्कीच विचार करायला लावणारा आहे. आगामी काळात जर बारामतीकरांनी दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी संपवली नाही, तर त्यांना त्यांची किंमत नक्कीच मोजावी लागेल, असे चित्र आहे. दौंड तालुक्यात काही नेते ’…आम्ही सांगेल तीच पूर्व दिशा’ आणि ’…आम्ही सांगेल तसेच कार्यकर्त्यांनी वागायचे’ अशारीतीने वागत आहेत.

हा प्रकार जर थांबविला गेला नाही, तर येणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समिती, दौंड नगरपालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीमध्येसुद्धा राष्ट्रवादीला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वच बाबींचा विचार करता पक्षात हुकूमशाही व मनमानी करणार्‍यांना लगाम लावणे गरजेचे आहे. काही जण आपल्या वरिष्ठ नेत्यांना अनेक कामांबद्दल चुकीची माहिती देतात याची देखील दखल पक्षाने घेतली पाहिजे. तसे झाले नाही तर येणार्‍या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असेल, असे दिसते.

बाजार समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांना समान जागा मिळाल्याने व भाजपने प्रथमच एवढी जोरदार टक्कर दिल्याने भाजपचे नेते मोठ्या खुषीत आहेत. परंतु, त्यांनीही आता दौंड तालुक्यातील सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर संस्थांमध्ये पक्षवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. भाजप हा मागील पाच वर्षांमध्ये तालुक्यात राष्ट्रवादीशी संघर्ष करू लागला असला, तरी म्हणावा तसा पक्ष वाढलेला नाही, हे मात्र तेवढेच खरे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबतीत अभ्यास करणे गरजेचे आहे.

Back to top button