पिंपरी : माताच बनताहेत अर्भकांसाठी वैरिणी !

पिंपरी : माताच बनताहेत अर्भकांसाठी वैरिणी !

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे) : अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले जातात. यातून गरोदर राहिलेल्या मुली पोटच्या गोळ्याला फेकून पसार होतात. यासह वैवाहिक आणि विवाहबाह्य संबंधांतून जन्मलेल्या अर्भकांनादेखील टाकून देत असल्याचे प्रकार पोलिस तपासात समोर येऊ लागले आहे. त्यामुळे कलियुगात काही जन्मदात्या माताच अर्भकांसाठी वैरिणी बनत असल्याचे बोलले जात आहे.

अर्भकांना कचराकुंडीत, रस्त्यावर सोडून देण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अनैतिक संबंधच नाही, तर वैवाहिक संबंधांतूनही नको असलेले नवजात मूल अशा पद्धतीने बेवारसपणे टाकून देण्यात येत असल्याचे काही प्रकरणांमधून उघड झाले आहे. अशा बालकांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून बालकल्याण समिती कार्यरत केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही समिती कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यात शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक अशा दोन समिती आहेत. या दोन्ही समितीकडून बेवारस अर्भक व अनाथ बालकांचे संगोपन, पालनपोषण यासाठी कामकाज केले जाते.

वयाच्या अंतरामुळेही अर्भक वार्‍यावर

काही दाम्पत्यांचे पहिले मूल 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असते. दरम्यान, महिला गरोदर राहिल्याचे वेळीच लक्षात न आल्यास बाळाचा जन्म होतो. मात्र, पहिले मूल आणि नवजात मूल यांच्या वयात मोठी तफावत असल्याने दाम्पत्य खजील होते. त्यामुळेदेखील नवजात बाळाचा त्याग केला जातो.

भविष्य अंधारातच

जिवंत अर्भक आढळल्यास त्याला बालकल्याण समितीच्या आदेशावरून शिशुगृहात ठेवले जाते. पालनपोषणाची जबाबदारी शिशुगृह चालक स्वीकारतात. स्पेशलाइज्ड अ‍ॅडाप्शन एजन्सीकडून या शिशूंना दत्तक देण्याची प्रक्रिया केली जाते. दत्तक न गेलेले मूल सहा वर्षांचे झाल्यानंतर शिशुगृहातून चाइल्ड केअर इन्स्टिट्यूटकडे दाखल केले जाते. त्यानंतरही त्याचे भविष्य अंधारातच असल्याचे सांगितले जाते.

नाळ तुटल्यापासूनच हेळसांड

बेवारस अर्भकाचे पालनपोषण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आईचे दूध उपलब्ध नसल्याने पावडरचे दूध अर्भकाला पाजले जाते. यातून बाळाचे पोषण होत असले तरी त्याला आईच्या मायेची ऊब मिळत नाही. एकंदरीतच नाळ तुटल्यापासूनच या बाळांची हेळसांड सुरू होते. एकीकडे काही दांपत्याला नवस करूनही मूल होत नाहीत. दत्तक मूल घेण्यासाठीदेखील त्यांना मोठी कसरत करावी लागते. कारण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी सध्या सुमारे तीन वर्षांचा प्रतीक्षा कालावधी आहे. त्यामुळे मुलांची किंमत ज्यांना मुलबाळ होत नाहीत, त्यांनाच असल्याचे मत एका संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केले.

वंशाचा दिवाच हवा

कुटुंबात मुलगाच जन्मावा, असाही काही जणांचा आग्रह असतो. मुलगी झाल्यास कौटुंबिक त्रास सहन करावा लागेल, या कारणावरूनही अर्भक फेकून दिल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. त्याचप्रमाणे अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भकही फेकून देतात. पूर्ण वाढ न झालेले अर्भक, अपंगत्व असलेले अर्भक, तिसरे किंवा चौथे अपत्यदेखील फेकून देण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे.

मातेला शिक्षा देण्याची तरतूद

मृत अर्भक फेकून दिले असेल तर न्यायालयाकडून दोन वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाऊ शकते. तसेच, दोषी मातेसह इतरांना दंडही लावला जातो. जिवंत अर्भकाला फेकल्यास दोषींवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

एक उदाहरण

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या कचराकुंडीत स्त्री जातीचे मृत अर्भक सापडले. 27 मे रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिस तपासात एका महिलेने अर्भक फेकून पळ काढल्याचे समोर आले होते.

अनैतिक संबंधांतून जन्मलेल्या बाळांना बदनामीच्या भीतीने टाकून देण्याचे प्रमाण तुलनेत जास्त आहे. नवजात अर्भक नको असल्यास त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अर्भकाचा कायदेशीर त्याग करता येतो. यामध्ये बाळ सुरक्षित राहते. अर्भक फेकून देणे हा गुन्हा आहे, त्यामुळे दाम्पत्यांनी असे कृत्य करू नये.
– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news