पुढारी ऑनलाईन डेस्क : यावर्षी जुलैमध्ये चांद्रयान-३ लॉन्च करण्यात येईल, अशी घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी आज (दि.२९) केली. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज NVS-01 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर एस सोमनाथ यांनी Mission Chandrayaan-3 या मोहिमेची घोषणा केली.
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी चांद्रयान-२ च्या अयशस्वी चाचणी संदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणतेही नवीन काम करत असल्यास त्यामध्ये यश आणि अपयश येत राहते. अपयश येणे हे सामान्य आहे. प्रत्येकवेळी आपण यशस्वी व्हावेच असे नाही; पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातून शिकून आपण पुढे जाणे हे महत्त्वाचे आहे. जेव्हा काही सूचना केल्या जातात तेव्हा आम्ही त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो; परंतु हे पण तितकेच खरे आहे की, प्रत्येकवेळी केलेल्या सूचना बरोबर असतीलच असे नाही. काही वेळा अपयश येऊ शकते, याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करणे सोडून दिले पाहिजेत. त्यामुळे आम्ही लवकरच चांद्रयान-३ ची (Mission Chandrayaan-3) मोहिम हाती घेत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चांद्रयान संदर्भातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांद्रयान-3 (Mission Chandrayaan-3)च्या प्रक्षेपणाची घोषणा ही चांद्रयान-2 च्या लँडर-रोव्हरच्या अपघातानंतर चार वर्षांनी करण्यात आली आहे. चांद्रयान-3 मोहीम जुलैमध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सूर्याच्या वैश्विक किरणांपासून संरक्षित चंद्राच्या कक्षेत लॉन्च करण्याची शक्यता आहे, असेही एस सोमनाथ यांनी याप्रसंगी स्पष्ट केले आहे. दरम्यान चांद्रयान-३ या मिशनची तयारी देखील अंतिम टप्प्यात असल्याची पुष्टी इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.
चांद्रयान-२ मोहीम २०१९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर या तीन वेगवेगळ्या यंत्रणांचा समाविष्ट असलेले मिशन अद्वितीय संयोजन होते. ऑर्बिटरने निर्दोषपणे काम केले. स्वतःला चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापित केले परंतु, चंद्राच्या दूरच्या बाजूला क्रॅश झाल्याने मोहिमेचे लँडर आणि रोव्हर युनिट कोसळले. परंतु सध्याच्या चांद्रयान-3 मोहिमेत केवळएक लँडर आणि एक रोव्हर प्रक्षेपित करण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे, असे देखील इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले आहे.