विधानसभेत मंत्री गायब; अजित पवार भडकले; फडणवीसांनी व्यक्त केली दिलगीरी

विधानसभेत मंत्री गायब; अजित पवार भडकले; फडणवीसांनी व्यक्त केली दिलगीरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात. मात्र सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आज (दि.१५) पुन्हा सहा पैकी केवळ एका लक्षवेधीवर सभागृहात चर्चा झाली, इतर लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली. मंत्र्यांच्या अनुपस्थितीचे प्रकार वारंवार होत असल्यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा रुद्रावतार सभागृहाने अनुभवला. मंत्री व्हायला पुढे-पुढे करता मग सभागृहात का उपस्थित राहत नाही, असा सवाल करुन मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात कोणताच रस नाही, विधीमंडळाची गरीमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच संसदीय कार्यमंत्री सुध्दा सभागृहात कायमच अनुपस्थित असतात, त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्यांनी केला.

विरोधी पक्षनेते पवार पुढे म्हणाले, विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यासाठी हे अधिवेश अत्यंत महत्वाचे आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी विधीमंडळ सभागृह व्यवस्थित चालावे यासाठी विरोधी पक्ष सहकार्य करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सभागृहाची प्रथा, परंपंरा मोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्याकडून होत आहे. सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात प्रश्न मांडत असतात, मात्र त्याला उत्तर देण्यासाठी मंत्री सभागृहात उपस्थित राहतच नाहीत. हे वारंवार घडत आहे. त्यामुळे लक्षवेधी सूचना वारंवार पुढे ढकल्याची नामुष्की सभागृहावर येत आहे. हे सभागृह योग्य प्रकारे चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते संसदीय कार्यमंत्री स्वत: अनेकवेळा सभागृहात अनुपस्थित असतात. सभागृहाचे कामकाज करण्यासाठी समन्वय साधण्यात ते कमी पडत आहेत. त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद खाली केले पाहिजे. मंत्रीपद मिळविण्यासाठी अनेक जण लॉबिंग करतात, पुढे-पुढे करतात मग सभागृहात कामकाजाच्यावेळी हे मंत्री अनुपस्थित का राहतात? मंत्र्यांना विधीमंडळात काम करण्यात कोणताही रस नाही, त्यांचा वेगळाच उद्योग सुरु असतो. तसेच सभागृहात अश्वासीत केलेल्या सर्व बैठका सुध्दा होत नाहीत. त्याबैठका घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

यावर उत्तर देताना देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब गंभीर असल्याचे म्हणत दिलगीरी व्यक्त केली. अपवादात्मक परिस्थितीत एखादा मंत्री अनुपस्थित राहिला तर ठीक आहे. अन्यथा सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहिलचं पाहिजे, असे निर्देश दिले जातील, असे ते म्हणाले. याबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, एखाद्या विषयावर चर्चा झाली नाही तर त्या मतदार संघातील जनतेवर अन्याय आहे. त्यामुळे मंत्र्यांनी उपस्थित राहण्याबाबतची जबाबदारी शासन घेईल. या अधिवेशनात २ हजार ३७६ लक्षवेधी ऑनलाईन प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २६१ विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. गेल्या सहा दिवसात ५७ लक्षवेधी चर्चेसाठी घेतल्या, असे ते म्हणाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news