Goa Politics | गोव्यातील असंतुष्टांचे बंड थंडावले, मायकल लोबोंसह ८ आमदार काँग्रेससोबतच!

Goa Politics | गोव्यातील असंतुष्टांचे बंड थंडावले, मायकल लोबोंसह ८ आमदार काँग्रेससोबतच!

पणजी : पुढारी वृत्तसेवा; गोव्यातील (Goa Politics) आठ आमदारांना घेऊन भाजपममध्ये सामील होण्याचा प्रयत्न फसलेले काँग्रेसचे आमदार व माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी शेवटी माघार घेतली आहे. त्यांचे बंड आता थंड झाले आहे. आपण पुढील पाच वर्षे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे वक्तव्य लोबो यांनी केले आहे.

११ काँग्रेस आमदारांपैंकी आठ आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मायकल लोबो यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी डिलायला लोबो व इतर तीन आमदार भाजपमध्ये जायला तयार होते. मात्र, दोन-तृतीयांश संख्या म्हणजेच आठ आमदार सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला तरच अपात्रता टाळता आली असती. पण इतर तीन आमदारांचे मन वळवण्यात लोबो यांना यश आले नाही. आणि त्यांचे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे मनसुबे धुळीला मिळाले.

इकडे काँग्रेस पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवले आहे. त्याचबरोबर त्यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत या दोघांची आमदारकी रद्द करावी अशी याचिका गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्याकडे दाखल केली आहे. आमदारांचे बंड थोपवण्यासाठी काल दिल्लीहून काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक हे गोव्यात दाखल झाले.

त्यांच्यासह गोवा प्रभारी दिनेश राव आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी काल रात्री आमदारांची बैठक काँग्रेस कार्यालय पणजी येथे घेतली. या बैठकीस दिगंबर कामत वगळता इतर सर्व आमदारांनी हजेरी लावली. सुरुवातीला तीनच आमदार या बैठकीला उपस्थित होते. मात्र हळूहळू इतर आमदार जमा झाले. मायकल रोबो हे बैठक सुरू झाल्यानंतर दोन तासांनी त्या ठिकाणी आले. त्यानंतर त्यांची मुकुल वासनिक यांच्याशी चर्चाही झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपण पुढील पाच वर्षे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगून अपात्रता याचिकेबाबत काँग्रेसच काय तो निर्णय घेईल, असे प्रतिपादन केले. (Goa Politics)


दरम्यान, मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर काँग्रेसला अद्यापही विरोधी पक्ष नेता निवडता आलेला नाही. अकरा आमदारातून हा नेता निवडायचा आहे. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव या दोघांपैकी एकाची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तसे पाहता आलेक्स सिक्वेरा हे काँग्रेसमधील ज्येष्ठ आमदार आहेत. ते माजी मंत्री आहेत. पण विरोधी पक्षनेत्याकडे हवे असलेली आक्रमकता त्यांच्यामध्ये नसल्याने संकल्प आमोणकर अथवा युरी आलेमाव यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news