गाेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत देणार राजीनामा | पुढारी

गाेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत देणार राजीनामा

पणजी, पुढारी वृत्‍तसेवा :  माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत हे कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. काँग्रेसच्या आमदारकीसह सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी आज, रविवारी (दि. १०) रात्री आठच्या दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिगंबर कामत यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करत असल्याचा आरोप केला. तसेच दिगंबर कामत यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असाही आरोप राव यांनी केल्यानंतर संतप्त झालेले दिगंबर कामत यांनी काँग्रेसची आमदारकी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री किंवा उद्या, सोमवारी सकाळी ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. मडगाव मतदारसंघ कामत यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा ते भाजपाच्या उमेदवारीवर उभे राहिले तरी ते निवडून येतील. सुरुवातीला ते दोन वेळा भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मुख्यमंत्रीपद प्राप्त केले होते. त्यामुळे पुन्हा ते भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर त्यांना विरोधी पक्षनेते न केल्याने कामत नाराज होते. त्यांनी पक्षापासून जवळजवळ फारकत घेतली होती. आज गोवा प्रभारी राव यांनी त्यांना बैठकांना तसेच पणजीत बोलावले मात्र कामत कुठेच गेले नाहीत.

दुसरीकडे दिगंबर कामत हे आता ६७ वर्षाचे झालेले असल्यामुळे ते आपल्या जागी आपल्या मुलाला किंवा पत्नीला मडगाव मधून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आणण्याची शक्यता आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले ‘आय एम रिटायर्ड’ हर्ट…

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी रविवारी आय एम रिटायर्ड हर्ट असे विधान केले. त्‍यांनी भाजपमधून काँग्रेसपक्षात प्रवेश केला आणि आणि ते मुख्यमंत्री झाले. वीज मंत्री, खाणमंत्री अशी विविध पदांचा त्‍यांनी कारभार पाहिला. तसेच ते विरोधी पक्षनेते होते.

विरोधी पक्षनेते पद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्याची त्यांना खंत होती. ज्येष्ठ असूनही त्यांना पक्षाने डावलले. माध्यमांनी त्यांना याविषयी विचारले असता त्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. २०१७ मध्ये काँग्रेसला जनादेश होता. त्यांचे १७ आमदार निवडून आले होते. गोवा फॉरवर्ड, काही अपक्षांना घेऊन सरकार करण्याची संधी त्यांना मिळाली होती. परंतु ते झाले नाही.आणि एकाच पक्षामध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी पाच माजी मुख्यमंत्री तयार होते. त्यामध्ये दिगंबर कामत देखील होते. काँग्रेसचा निर्णय ठरला नाही आणि अखेर भाजपला सत्‍ता मिळाली.

दिगंबर कामत यांनी केलेली दिल्लीवारीची चर्चा मोठी रंगली होती. यानंतरच्या घडामोडी पाहता ते भाजपचे मुख्यमंत्री होणार असा बोल बाला झाला होता. तर दिगंबर यांचा एक पाय काँग्रेसमध्ये तर दुसरा भाजपमध्ये अशी चर्चा सातत्याने होती. त्यांच्या विश्वासार्हते विषयी काँग्रेस पक्षामध्ये ही प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे ते भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसमधील जाणकारांना, राजकीय अभ्यासकांना याचे आश्चर्य वाटले नाही. मुख्यमंत्री पदासह अनेक पदावर काम केल्‍याने ते सत्ते शिवाय राहू शकत नाहीत, हेच वास्तव आहे. त्यामुळे कदाचित ‘आय एम रिटायर्ड हर्ट’ असे ते म्‍हणाले असावेत.

हेही वाचा

Back to top button